श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करीत यजमानांचा पहिला डाव १८३ धावांत संपुष्टात आणला. त्यानंतर फलंदाजी करताना भारतीय संघाने सलामीजोडी स्वस्तात गमावली. रोहित शर्मा(९) आणि लोकेश राहुल (७) धावांवर बाद झाले. त्यानंतर संयमी फलंदाजी करीत कर्णधार कोहली आणि शिखर धवनने डाव सावरला. पहिल्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या २ बाद १२८ अशी आहे. दिवसाअखेर शिखर धवन ५३ तर कर्णधार विराट कोहली ४४ धावांवर नाबाद आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱया श्रीलंकेच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांसमोर दाणादाण उडाली. फिरकीपटू आर.अश्विनच्या फिरकी जादूवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. अश्विनने श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले, तर अमित मिश्राने दोन विकेट्स घेतल्या. ईशांत शर्मा आणि वरुण अरोन यांनीही चांगली साथ देत प्रत्येकी एक विकेट घेतली. गॅले कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करीत श्रीलंकेच्या निर्णय चूकीचा ठरवून दाखवला. ५ बाद ५५ अशी बिकट अवस्था श्रीलंकेची झाली होती. ईशांत शर्माने श्रीलंकेची सलामीजोडी फोडून संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अश्विनने संगकारा, लहिरु थिरीमाने आणि जेहान मुबारक या महत्त्वाच्या खेळाडूंना माघारी धाडले, तर वरुण अरोनने कुशल सिल्व्हाला बाद केले आहे. कर्णधार अँजलो मॅथ्यूज (२६) दिनेश चंडीमलच्या (५) साथीने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अश्विनने ही जोडी देखील फोडली. त्यानंतरचे ठराविक अंतराने श्रीलंकेचे खेळाडू बाद होत गेले आणि यजमानांचा डाव १८३ धावांत संपुष्टात आला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना करूणारत्ने व सिल्हाने सावध सुरूवात केली खरी मात्र ६ व्या षटकांत इशांत शर्माच्या गोलंदाजीवर करूणारत्ने ९ धावांवर तर ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वरूण अरोनच्या गोलंदाजीवर सिल्वाचा( ५) बाद झाला. त्यानंतर श्रीलंकेचा भरवशाचा फलंदाज संघकारा मैदानात आल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला, मात्र ५ धावांवर खेळत असताना अश्विनने त्याला, थिरिमनेलाही (१३) आणि लागोपाठ मुबारकला (०) माघारी धाडले.
भारतीय संघ श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याची २२ वर्षांची प्रतीक्षा संपविण्यास उत्सुक असून भारताने ३ फिरकी गोलंदाजांसह ५ जलद गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या दिवसाअखेर भारताची धावसंख्या २ बाद १२८
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करीत यजमानांचा पहिला डाव १८३ धावांत संपुष्टात आणला.
First published on: 12-08-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs sri lanka live cricket score st test day