आयपीएल २०२१ नंतर विजय हजारे चषक स्पर्धेमध्ये आपल्या तुफान फलंदाजीने अनेकांचं लक्ष वेधून घेणारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) लवकरच भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. पृथ्वी शॉला श्रीलंकन दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka Series) भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आला आहे. जुलै महिन्यामध्ये भारतीय संघ एकदिवसीय सामना आणि टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेला जाणार आहे. या दौऱ्यासाठी जाणाऱ्या सर्व खेळाडूंना सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं आहे. पृथ्वी शॉचाही यामध्ये समावेश आहे. सध्या पृथ्वी हॉटेलमधील आपल्या रुममध्ये क्वारंटाइन आहे. क्वारंटाइनच्या कालावधीमध्ये पृथ्वीने सोशल नेटवर्किंगवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> ‘त्याने’ ५४ चेंडूंमध्ये ९६ धावा करत मिळवून दिला संघाला विजय; आंतरराष्ट्रीय कारकीर्द मात्र संपल्यात जमा

पृथ्वी शॉने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या बेडवर एक डम्बेल ठेवल्याचं दिसत आहे. पृथ्वीने हा फोटो शेअर करताना त्याला, ‘क्वारंटाइन लाइफ’ अशी कॅप्शन दिलीय. पृथ्वीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्याला ट्रोल करत मजेदार कमेंट केल्यात. एका चाहत्याने पृथ्वी भाई डम्बेल उचतात आणि आपल्या बेडवर नेऊन त्याला झोपवतात, अशी कमेंट केलीय. अनेकांनी पृथ्वीच्या या फोटोवर अशाच प्रकारच्या कमेंट करत डम्बेलबद्दल चर्चा केल्याचं दिसत आहे. अनेक चाहत्यांना पृथ्वीने शेअर केलेल्या डम्बेलचा फोटो पाहून आश्चर्य वाटलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या डम्बेलवर ५० असा आकडा लिहिला आहे. अनेकांना हे डम्बेल ५० किलोचं असल्याचं वाटत आहे. पृथ्वी एवढं वजनदार डम्बेल कसं उचलतो असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र डम्बेलवर लिहिलेला ५० आकडा हा किलोचा नसून पाउंडचा आहे. म्हणजेच हा डम्बेल २२.५ किलो वजनाचे आहे.

पृथ्वीने हॉटेलमधून क्वारंटाइन लाइफ अशा कॅप्शनसहीत फोटो पोस्ट केलाय

पृथ्वी शॉकडून श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या दौऱ्यात होणाऱ्या सहा सामन्यांमध्ये पृथ्वी कर्णधार शिखर धवनसोबत सलामीला फलंदाजीला येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पृथ्वी आणि शिखर धवन हे दोघे आयपीएलमध्ये सुद्धा दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीला फलंदाजी करतात. यंदाच्या आयपीएलच्या पर्वामध्ये ८ सामन्यांमध्ये दोघांनी दिल्लीच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिल्याचं पहायला मिळालं. या दोघांनी केलेल्या कामगिरीचा संघाला बराच फायदा झाला असून मालिका स्थगित झाली तेव्हा दिल्लीचा संघ पॉइण्ट टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. दिल्लीने आयपीएल २०२१ मध्ये आतापर्यंत ८ पैकी ६ सामने जिंकलेत.

पृथ्वीबद्दल बोलायचं झाल्यास त्याने आयपीएल २०२१ मध्ये खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये ३८.५० च्या सरासरीने ३०८ धावा केल्या आहेत. पृथ्वीने यात तीन अर्धशतकेही झळकावलीय. त्याचा स्ट्राइक रेट १६६.४८ इतका होता. पृथ्वीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत होता. विजय हजारे चषकामध्येही पृथ्वीने ८ सामन्यांमध्ये १६५.४० च्या सरासरीने ८२७ धावा केल्या. यामध्ये चार शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. यामध्ये पृथ्वीची सर्वोच्च धावसंख्या २२७ इतकी राहिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs sri lanka series prithvi shaw troll for photo scsg