भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहाली येथे खेळवला जातोय. भारताने आपला पहिला डाव घोषित केला असून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अजय जडेजाने धडाकेबाज कामगिरी केलीय. जडेजाने आज दिवसभर दमदार फलंदाजी केल्यामुळे श्रीलंकन गोलंदाजांना पळता भूई थोडी झाली. त्याने आपली दीडशतकी खेळी पूर्ण करत तब्बल १७५ धावा केल्या. जडेजाच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर ५७४ धावांचा डोंगर उभा केला. सध्या भारताने आपला पहिला डाव घोषित केल्यामुळे श्रीलंकन संघाचे फलंदाज मैदानात उतरले असून सामन्याला नुकतीच सुरुवात झालीय.
तत्पूर्वी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाचे आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा मैदानात फलंदाजीसाठी उतरले. दोघांनीही चांगला खेळ खेळत शतकी भागिदारी केली. मात्र श्रीलंकन गोलंदाज कमलच्या चेंडूवर अश्विन झेलबाद झाला. त्याने ८२ चेंडूंमध्ये आठ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. तर दुसरीकडे जडेजाने मैदानावर घट्ट पाय रोवून श्रीलंकन टीमला जेरीस आणले.
जडेजाने २२८ चेंडूमध्ये तब्बल १७ चौकार आणि ३ षटकार यांच्या मदतीने १७५ धावा केल्या. पुढे जयंत यादवच्या रुपाने भारताला आठवा धक्का बसला. फर्नांडोच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. यादवने फक्त दोन धावा केल्या. मात्र पुढे मोहम्मद शामीने जडेजाला चांगली साथ दिली. शामीच्या मदतीमुळेच भारतीय धावफलक थेट ५७८ वर पोहोचला. शेवटी भारताने आपला डाव घोषित केल्यामुळे मोहम्मत शामी आणि जडेजा नाबाद राहीले. १७५ धावा करुन जडेजाने कसोटी सामन्यातील आपले दुसरे शतक झळकावले.
याआधी सामन्याचा पहिला दिवस ऋषभ पंतच्या नावावर राहिला. त्याने ९७ चेंडूमध्ये ९ चौकार आणि ४ षटकार यांच्या मदतीने ९६ धावा केल्या. तसेच हनुमा विहारीने अर्धशतकी खेळी करत १२८ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र तो अर्धशतकही पूर्ण करु शकला नाही. कोहलीने ७६ चेंडूमध्ये पाच चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या.
दुसरीकडे श्रीलंकन संघातील कमल, विश्वा फर्नांडो, एम्बुल्डेनिया या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर लाहिरी कुमरा आणि धनंजय सिल्वा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. श्रीलंकन गोलंदाजांपैकी एम्बुल्डेनियाने एकूण ४६ षटके टाकून १८८ धावा दिल्या. तर विश्वा फेर्नांडोने २६ षटकांमध्ये भारतीय संघाला १३५ धावा दिल्या. सध्या श्रीलंकन खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले असून त्यांच्या डावाला नुकतीच सुरुवात झाली आहे.