भारत विरुद्ध श्रीलंका दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु झाला आहे. दोन्ही संघांसाठी पहिला कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून विजयी आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा कस लागणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लंचपर्यंत भारताने २ गडी गमवून १०९ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा २८ चेंडूत २९ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ६ चौकार मारले. लहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर सुरंगा लकमलने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लगेचच मयंक अग्रवाल लसिथ इम्बुलडेनियाच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. त्याने ४९ चेंडूत ३३ धावा केल्या. या खेळीत ५ चौकारांचा समावेश आहे. भारताला विराट कोहलीच्या रुपाने तिसरा धक्का बसला. विराट कोहली ४५ धावा करून तंबूत परतला. विराट कोहलीनंतर हनुमा विहारी ५८ धावा करून बाद झाला. त्यानंतर पाचव्या गड्यासाठी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली भागिदारी केली. पण धनंजया डिसिल्वाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर पायचीत झाला. त्याने ४८ चेंडूत २७ धावा केल्या. ऋषभ पंतचं शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. ९६ धावसंख्येवर असताना सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा