तिसऱ्या लढतीमधील विजयासह भारताचा ट्वेन्टी-२० मालिकेवर कब्जा
रविचंद्रन अश्विनच्या अविस्मरणीय कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेन्टी-२० लढतीत श्रीलंकेचा धुव्वा उडवला. श्रीलंकेला फलंदाजीला आमंत्रित करून भारताने अवघ्या ८२ धावांतच त्यांचा डाव गुंडाळला. मग केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठत भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. या विजयासह भारतीय संघाने आगामी आशिया चषक आणि विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले.
ट्वेन्टी-२० सामने म्हणजे ‘धावांची फॅक्टरी’. त्यामुळे भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र खेळपट्टी आणि वातावरणाचा अचूक अभ्यास केलेल्या धोनीचा निर्णय अश्विनने पहिल्याच षटकात सार्थ ठरवला. निरोशन डिकवालाला धोनीने यष्टीचीत करत माघारी धाडले. त्याच षटकात अश्विनचा चेंडू स्वीप करण्याचा दिलशानचा प्रयत्न फसला. भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणाऱ्या दिनेश चंडिमलला अश्विननेच हार्दिक पंडय़ाकडे झेल देण्यास भाग पाडले. पदार्पणीवर गुणरत्नेला बाद करत अश्विनने श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. ४ बाद २० या धक्क्यातून श्रीलंकेचा संघ सावरलाच नाही. त्यावेळी अश्विनच्या कामगिरीचे वर्णन ३-१-५-४ असे विलक्षण होते. अश्विनचा झंझावात थांबताच अनुभवी आशिष नेहराने सिरीवर्दनाला त्रिफळाचीत केले. दासुन शनकाने आक्रमक पवित्रा घेत नीचांकी धावसंख्येचा विक्रम टाळला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सीकुगे प्रसन्ना तंबूत परतला. रवींद्र जडेजाने शनकाला बाद केले. कामचलाऊ गोलंदाजी सुरेश रैनाने सचित्र सेनानायके आणि थिसारा परेरा यांना बाद करत श्रीलंकेच्या शंभरी गाठण्याच्या प्रयत्नांना वेसण घातली. घोटीव यॉर्करसह दिलहारा फर्नाडोला बाद करत बुमराहने श्रीलंकेचा प्रतिकार ८२ धावांतच संपुष्टात आणला. ट्वेन्टी-२० प्रकारातील श्रीलंकेची ही निचांकी धावसंख्या आहे. अश्विनने ४ षटकांत केवळ ८ धावा देत ४ बळी घेतले. रैनाने २ तर नेहरा, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
छोटेखानी लक्ष्य मिळालेल्या भारतीय संघाने सावध सुरुवात केली. दुश्मंता चमिराने रोहित शर्माला १३ धावांवर बाद केले. मात्र यानंतर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी चौकार आणि एकेरी-दुहेरी धावांची सुरेख सांगड घालत विजयावर शिक्कामोर्तब केले. धवनने ५ चौकार आणि एका षटकारासह ४६ तर रहाणेने एका चौकारासह २२ धावा केल्या. या लढतीसह मालिकेत ९ बळी घेणाऱ्या अश्विनला सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारतीय संघाने जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वसमावेशक सांघिक कामगिरीमुळे हा विजय साकारला. अश्विनने सुरेख गोलंदाजी केली आणि त्याला अन्य गोलंदाजांनी उत्तम साथ दिली. सातत्याने चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. यादरम्यान एखाद्या सामन्यात पराभूत झाल्यास विचलित होण्याची गरज नाही. चाहत्यांच्या अपेक्षांचे दडपण असते. पण एकावेळी एकाच सामन्याचा विचार करणे आवश्यक आहे. आयपीएलच्या आठ हंगामांमुळे ट्वेन्टी-२० प्रकारात खेळण्याचा सराव झाला आहे. फिरकीपटूंना पोषक खेळपट्टी असल्याने आम्हाला प्रयोग करण्याची संधी मिळाली.
-महेंद्रसिंग धोनी, भारतीय कर्णधार

अशीच कामगिरी नेहमी व्हावी अशी इच्छा आहे. चेंडू बॅटवर चांगल्या पद्धतीने येत होता. मी कसून मेहनत करत होतो. संघाच्या विजयात योगदान देण्यासाठी मी आतूर होतो. आज पंचक मिळेल असे वाटले होते. खेळपट्टीत थोडा ओलसरपणा होता. नवीन चेंडू हाताळताना मी प्रयोग केले. फलंदाजांनी मी काय चेंडू टाकतोय याची कल्पना येऊ दिली नाही. चेंडूला उंची देण्याचे धैर्य माझ्याकडे आहे. विकेट मिळवल्यानंतर मला निराळीच ऊर्जा मिळते.
-रवीचंद्रन अश्विन, सामनावीर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs srilanka 3rd t20 live scores india beat sri lanka by 9 wickets win series 2