IND vs WI 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून (२२ जुलै) सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शिखर धवनच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि उपकर्णधार रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. या दुखापतीतून तो सावरला नाही तर संपूर्ण मालिकेतून बाहेर जाऊ शकतो.
याशिवाय संघाचा नियमित सलामीवीर रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीतीमध्ये शिखर धवनसोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न आहे. वेस्ट इंडीजमध्ये दाखल झालेल्या संघात ईशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल हे तीन पर्याय उपलब्ध आहेत.
क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर भारतीय संघ गेल्या १५ वर्षांपासून एकदिवसीय सामना हरलेला नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकून विजयाची ही परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. तर, निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघ पाहुण्यांना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल.
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. पावसामुळे भारतीय संघाला इनडोअर सराव करावा लागला होता. परंतु, आज सामन्याच्या दिवशी ३० अंश सेल्सिअस तापमानासह अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे.