IND vs WI 1st ODI Result: भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान शुक्रवारपासून (२२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर या मालिकेतील पहिला सामना झाला. ही अतितटीची लढत भारताने तीन धावांनी जिंकली आहे. त्यामुळे भारताला मालिकेत १-० अशी आघाडी मिळाली आहे. भारताने वेस्ट इंडीजला ३०९ धावांचे लक्ष्य दिले होते.

भारताने दिलेले ३०९ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानावर आलेल्या यजमानांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शाय होप सात धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र, कायले मायर्स आणि शमराह ब्रूक्स यांनी दमदार खेळ दाखवत विंडीजच्या डावाला आकार दिला. मायर्सने ७५ आणि ब्रूक्सने ४६ धावा केल्या. त्यापाठोपाठ ब्रँडन किंगने अर्धशतकी खेळी करून संघाला मजबूत स्थितीमध्ये आणले. शेवटी अकील हुसेन आणि रोमरिओ शेफर्ड जोडी भारताच्या तोंडचे पाणी पळवले होते. शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १५ धावांची गरज होती. मात्र, विंडीजचा संघ केवळ ११ धावाच करू शकला.

त्यापूर्वी, वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शुभमन गिल आणि शिखर धवनने भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली. गिल ६४ धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि धवन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९० धावांची भागीदारी केली.

श्रेयस अय्यरने ५४ धावांचे योगदान दिले. भारताचा कर्णधार शिखर धवनचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने ९९ चेंडूत ९७ धावा केल्या. त्याच्या या खेळीदरम्याने त्याने १० चौकार आणि तीन षटकार लगावले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार अवघ्या १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यष्टिरक्षक संजू सॅमसनने १३ तर दीपक हुडाने ३२ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. वेस्टइंडीच्यावतीने अल्जारी जोसेफ आणि गुडाकेश मोतीने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व आले आहे.

Story img Loader