प्रोव्हिडन्स (गयाना) : पहिल्या दोन सामन्यांतील साधारण कामगिरीनंतर भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका गमवायची नसल्यास आज, मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय अनिवार्य आहे. या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय फलंदाजांना कामगिरीत सुधारणा करावी लागेल.
विंडीजमधील खेळपट्टय़ा फलंदाजीला अनुकूल नाहीत, तरीही आम्ही अधिक झुंजार फलंदाजी करून १० ते २० धावा अतिरिक्त करणे गरजेचे होते, असे तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातील पराभवानंतर भारताचा कर्णधार हार्दिक पंडय़ाने मान्य केले. भारताला २०१६ मध्ये वेस्ट इंडिजकडून ट्वेन्टी-२० मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर आहे. दुसरीकडे, विंडीजचा संघ मालिका जिंकण्यापासून एक विजय दूर आहे. त्यांच्या शीर्ष फळीतील फलंदाज अपयशी ठरत असले, तरीही डावखुरा निकोलस पूरन निर्णायक खेळी करत आहे. पूरन व शिम्रॉन हेटमायर पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूंवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना रोखण्याचे भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान आहे.
’ वेळ : रात्री ८ वा. ’ थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स, फॅनकोड अॅप, जिओ सिनेमा