वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना आजपासून हैदराबादमध्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकोट येथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात अवघ्या तीन दिवसांमध्येच पाहुण्या वेस्ट इंडिजला धूळ चारल्यानंतर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून निर्भेळ यश संपादन करण्याचे विराटसेनेचे लक्ष्य असणार आहे.

पहिल्या लढतीत भारताने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवताना विंडीजला एक डाव व २७२ धावांनी नेस्तनाबूत केले. त्यामुळे आत्मविश्वास खालावलेल्या विंडीजवर आणखी एक आघात करून एकदिवसीय मालिकेपूर्वी जोमाने सराव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.

२०११ च्या दौऱ्यात भारताने विंडीजला २-० असे नमवले होते, तर २०१३ मध्ये त्यांनी दोन्ही कसोटी सामने तीन दिवसांच्या आतच संपवून विजयास गवसणी घातली होती. यंदाही भारतालाही सुवर्णसंधी आहे.

फलंदाजीत भारताची मदार प्रामुख्याने कर्णधार विराट कोहली, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा यांच्यावर आहे. त्याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि यष्टिरक्षक रिषभ पंत हेदेखील चांगल्या फॉर्मात आहेत. फिरकीची धुरा वाहण्यासाठी रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव सक्षम आहेत.

दुसरीकडे अनुभवी गोलंदाज जेसन होल्डर अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे वेस्ट इंडिजच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. शॅनन गॅब्रिएलसुद्धा दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे विंडीजला नव्या दमाच्या खेळाडूंची गरज भासणार आहे. भारताने मात्र पहिल्या कसोटीतील १२ जणांचा संघच कायम राखला असून सामन्याच्या दिवशी सकाळीच अंतिम ११ खेळाडूंची नावे जाहीर होतील.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.
  • वेस्ट इंडिज : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), सुनील अ‍ॅम्ब्रिस, किरॉन पॉवेल, शाई होप, शेन डॉवरिच, रोस्टन चेस, शॅनन गॅब्रिएल, देवेंद्र बिशू, किमार रोच, किमो पॉल, जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर.

सामन्याची वेळ: सकाळी ९:३० वा.

थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs west indies
Show comments