IND vs WI 4th T20 Reslut: भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडातील लॉडरहिलमधील ‘सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड’वरती पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ५९ धावांच्या फरकाने पराभव केला. यापूर्वी, भारताने मालिकेतील पहिला आणि तिसरा सामनाही जिंकला होता त्यामुळे भारताकडे आता ३-१ अशी विजयी आघाडी आली आहे.
भारताने वेस्ट इंडीजला विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे यजमान संघ १९.१ षटकांमध्येच गुंडाळला गेला. विंडज संघाला १३२ धावांपर्यंतच मजल मारता आली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडीजची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ८२ धावांपर्यंत त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला होता. वेस्ट इंडीजच्यावतीने कर्णधार निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी सर्वाधिक २४-२४ धावा केल्या. भारताच्या अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले. तर, आवेश खान, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.
त्यापूर्वी, वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून १९१ धावा केल्या होत्या. ऋषभ पंतने ३१ चेंडूत सर्वाधिक ४४ धावा केल्या.
त्याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ३३, संजू सॅमसन नाबाद ३०, सूर्यकुमार यादवने २४ आणि दीपक हुडाने २१ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने २० धावा करून नाबाद राहिला. वेस्ट इंडीजच्या अल्झारी जोसेफने चार षटकांत २९ धावा देत दोन गडी बाद केले तर ओबेड मॅकॉयनेही दोन गडी बाद केले.