भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका

किंग्स्टन : सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत उदयोन्मुख सलामी फलंदाज मयांक अगरवालने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतक साकारले. त्यामुळे अखेरचे वृत्त हाती आले, तेव्हा भारताने ४० षटकांत २ बाद ११२ धावांपर्यंत मजल मारली.

विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल व मयांक यांनी सावध सुरुवात केल्यानंतर होल्डरने विंडीजला पहिले यश मिळवून दिले. त्याने राहुलला १३ धावांवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या भारदस्त शरीरयष्टीच्या पदार्पणवीर रकहीम कोर्नवॉलकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर कोर्नवॉलने त्याच्या तिसऱ्याच षटकात भरवशाच्या चेतेश्वर पुजाराला अवघ्या ६ धावांवर बाद करून कारकीर्दीतील पहिला बळी मिळवला. ४६ धावांवर दोन फलंदाज माघारी परतल्यावर कर्णधार विराट कोहली व मयांक यांनी किल्ला सांभाळला. उपहारानंतर मयांकने केमार रोचला चौकार लगावून कसोटी कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. अखेरचे वृत्त हाती आले, तेव्हा मयांक ५५, तर कोहली २७ धावांवर खेळत होता.

रिचर्ड्स रुग्णालयात दाखल

वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांना शुक्रवारी भारत-विंडीज यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीच अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ६७ वर्षीय रिचर्ड्स हे समालोचक म्हणून या मालिकेसाठी कार्यरत असून दमट वातावरणाचा त्यांना त्रास झाल्याने रुग्णालयात नेल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader