पीटीआय, डॉमिनिका
भारतीय कसोटी संघात बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून आज, बुधवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर यशस्वी जैस्वालला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यासह भारताच्या सर्वच फलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.
भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीतील पराभवानंतर प्रथमच मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे, विंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक पात्रता स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पहिल्यांदा कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कामगिरी उंचावून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात करण्यासाठी उत्सुक असतील. डॉमिनिका येथील विन्डसर पार्कवर सहा वर्षांनंतर कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. या अपयशानंतर निवड समितीने अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज यशस्वीला संधी मिळू शकेल. देशांतर्गत क्रिकेट आणि ‘आयपीएल’मधील चमकदार कामगिरीच्या बळावर यशस्वीने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आता विंडीजविरुद्ध दोनही कसोटी सामन्यांत दर्जेदार कामगिरी करताना भारतीय संघातील स्थान भक्कम करण्याचा यशस्वीचा प्रयत्न असेल.
यशस्वी हा मूळ सलामीवीर असल्याने त्याला कर्णधार रोहित शर्मासह सलामीला पाठवून शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणे अधिक योग्य ठरेल असाही मतप्रवाह आहे. परंतु गिलने सलामीला खेळताना गेल्या काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा धोका भारतीय संघ व्यवस्थापन पत्करण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय संघ विंडीजविरुद्धच्या दोन सामन्यांनंतर बराच काळ कसोटी क्रिकेट खेळणार नाही. मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वर्षांअखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल. त्यानंतर २०२४-२५च्या हंगामात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. या आव्हानांसाठी सज्ज होण्याकरिता विंडीज दौरा यशस्वीसारख्या युवा खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरू शकेल.विंडीजच्या संघाने गेल्या काही काळात आपली सर्वोत्तम कामगिरी कसोटी क्रिकेटमध्ये केली आहे. विंडीजने गेल्या पाचपैकी तीन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे विंडीजला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ निश्चितच करणार नाही.
संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज : क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेगनारायण चंद्रपॉल, जर्मेन ब्लॅकवूड, जोश्वा डा सिल्वा (यष्टिरक्षक), अलिक अथानाझे, रहकीम कॉर्नवॉल, शॉनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, रेमन रेफर, केमार रोच, कर्क मकेन्झी, जोमेल वॅरिकन.
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्ट्स, फॅनकोड अॅप, जिओ सिनेमा