भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणारा चौथा वन-डे सामना बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने, मुंबईच्या वानखेडे मैदानावरुन ब्रेबॉन स्टेडीयमवर हलवला. प्रशासकीय समितीच्या या निर्णयामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन चांगलीच नाराज झाली असून या निर्णयाबद्दल संघटनेला कोणतीही पूर्वसुचना देण्यात आली नसल्याचं एमसीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एस. नाईक यांनी प्रशासकीय समितीला इ-मेल लिहून सामन्याचं ठिकाण हलवण्यामागचं कारण विचारलं आहे.

“सामन्याचं ठिकाण हलवण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय समितीकडून कोणत्याही प्रकारची सुचना मिळालेली नाहीये. प्रसारमाध्यमांमध्ये सामन्याचं ठिकाण वानखेडे मैदानावरुन ब्रेबॉनला हलवण्यात आल्याचं आम्हाला समजलं, आमच्यासाठी संघटना म्हणून हा एक धक्का आहे. त्यामुळे सामन्याचं ठिकाण का बदलण्यात आलं याचं कारण आम्हाला कळवावं.” अशा आशयाचा संदेश लिहून एमसीएने प्रशासकीय समितीकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशनवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. मात्र यानंतर दोन्ही प्रशासकांनी एमसीएच्या ढिसाळ कारभारामुळे राजीनामा देणं पसंत केलं होतं. त्यामुळे एमसीएला नेहमीच्या कामकाजात अडचणी येत होत्या. यासाठी एमसीएच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयकडे प्रशासकीय व आर्थिक बाबींमध्ये मदतही मागितली होती. मात्र यानंतर प्रशासकीय समितीने थेट सामन्याचं ठिकाण ब्रेबॉन स्टेडीयमवर हलवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एमसीएने पाठवलेल्या इमेलला प्रशासकीय समिती काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader