India Tour of West Indies : इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय आणि पाच टी २० समान्यांच्या दोन मालिका खेळवल्या जाणार आहेत. त्यापैकी एकदिवसीय मालिकेसाठी आज (६ जून) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली नवीन खेळाडूंचा भरणा असलेला संघ कॅरेबियन बेटांवर जाणार आहे. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याच्या निवड समितीच्या या निर्णयावर माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाणने नाराजी व्यक्त केली आहे.
भरगच्च वेळापत्रकामुळे गेल्या काही मालिकांमध्ये भारताला संघ निवडीत सातत्य राखता आलेले नाही. २२ जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्धच्या होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या १६ सदस्यीय संघामध्ये ही गोष्ट प्रतिबिंबित झाली. भारताने विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, मोहम्मद शामी आणि जखमी केएल राहुल यांना विश्रांती दिली आहे. यापैकी विराट कोहली आणि रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहेत.
यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकापूर्वी हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये परत येणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना अधिकाधिक क्रिकेट खेळावे लागणार आहे. असे असूनही त्यांना संघातून वगळल्याने माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाणने आश्चर्य व्यक्त केले आहे. इरफानने सोशल मीडियावर निवड समितीच्या या निर्णयाचा समाचार घेतला आहे. ‘खेळाडूंना विश्रांती दिली तर ते फॉर्ममध्ये परतणार नाहीत,’ असे ट्वीट त्याने केले आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेचा भाग नव्हते. याशिवाय, एजबस्टन कसोटीमुळे ते आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांची टी २० मालिकेतदेखील खेळू शकले नाहीत. आता ७ जुलै रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी २० सामन्यातही विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह खेळणार नाहीत. त्यात भर म्हणजे त्यांना वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. अशा स्थितीमध्ये त्यांना फॉर्ममध्ये येण्याची संधीच मिळणार नाही.