India Tour of West Indies : सध्या सुरू असलेला इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे तीन एकदिवसीय आणि पाच टी २० समान्यांच्या दोन मालिका भारतीय संघाला खेळायच्या आहेत. त्यापैकी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व एका शिखर धवन करणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज (६ जुलै) वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. त्यानुसार, स्फोटक फलंदाज शिखर धवन भारतीय संघाचा कर्णधार असले तर रविंद्र जडेजाकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. निवडण्यात आलेल्या १६ सदस्यीय संघातून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, मोहम्मद शामी आणि जखमी केएल राहुल यांना वगळण्यात आले आहे. या सर्व खेळाडूंना विश्रांती दिल्याचे सांगितले गेले आहे.
गेल्यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर धवनने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. तेव्हा इतर वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यात व्यग्र होते. वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेमध्ये ऋतुराज गायकवाड किंवा शुबमन गिल यापैकी एकासोबत धवन सलामीला येताना दिसेल. ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसन किंवा ईशान किशन यष्टीरक्षण करताना दिसतील. तर, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल यांच्यासह अष्टपैलू दीपक हुडादेखील फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसेल.
भारताच्या वेस्ट इंडिज आणि यूएसए दौऱ्याची सुरुवात २२ जुलैपासून होणार आहे. सुरुवातीला एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. त्रिनिदाद येथील सामन्याने मालिकेची सुरुवात होईल. त्यानंतर पाच टी २० सामन्यांची मालिका होईल. टी २० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेमध्ये होणार आहेत.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय चमू : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.