स्वामी विवेकानंद जयंतीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘भारत जागो दौड’ बुधवारी, ११ सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे. पुरुषांसाठी १३ किलोमीटरची तर महिलांसाठी ९.२ किलोमीटरची दौड मुंजे चौकातून सुरू होईल. याशिवाय सर्वसामान्यांसाठी दोन किलोमीटरची सेलेब्रिटी दौडही या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे. नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, नागपूर महापालिका आणि विद्यापीठाचा शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही दौड होईल. एकूण १५ हजाराच्यावर स्पर्धक दौडीत सहभागी होतील, असा विश्वास जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव आणि दौड संयोजक शरद सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. दौडी दरम्यान पुरुषांच्या १३ किलोमीटरच्या दौडीच्या मार्गावर दोन फिडिंग पॉईंट आणि दोन स्पंजिंग पॉईंट राहणार आहेत. तर महिलांच्या नऊ किलोमीटर अंतराच्या दौडीसाठी दोन फिडिंग पॉईंट आणि एका स्पंजिंग पॉईंटची व्यवस्था असेल. आयोजकांनी विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची राशी वाढवावी, असा आग्रह प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांनी धरल्याने आयोजकांनी पुरस्काराची राशी वाढवली. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांसाठी पुरस्कार सारखेच आहेत.
प्रथम येणाऱ्यास ११ हजार रुपये रोख, सायकल व स्पोर्ट शूज प्रदान करण्यात येतील. राजेश सावडिया यांनी सायकल प्रायोजित केली आहे. द्वितीय पुरस्कार सात हजार, तृतीय पुरस्कार पाच हजार, चतुर्थ पुरस्कार तीन हजार आणि पंचम पुरस्कार दोन हजार रुपयांचा असेल. भाजपा महाराष्ट्र क्रीडा सेलतर्फे दोन्ही स्पर्धेतील पहिल्या पाच खेळाडूंना स्पोर्ट शूज दिले जातील.
पुरुषांच्या दौडीला कुलगुरू डॉ. विलास सपकाळ सकाळी ७.१५ वाजता हिरवी झेंडी दाखवतील. तर सकाळी ७.२५ वाजता सुरू होणाऱ्या महिलांच्या दौडीला महापौर अनिल सोले हिरवी झेंडी दाखवतील. सेलिब्रिटी दौडीला सकाळी ७.३० वाजता पोलीस आयुक्त के.के. पाठक हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करतील. सहभागासाठी येणाऱ्यांसाठी पार्किंगची नि:शुल्क व्यवस्था यशवंत स्टेडियम समोरील मॉरिस कॉलेजच्या मैदानावर करण्यात आली आहे. दौडीच्या तांत्रिक व्यवस्थापनासाठी नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे २०० तांत्रिक पंच, अधिकारी जय्यत तयारीत आहेत. पुरुषाच्या दौडीसाठी बंटीप्रसाद यादव तर महिलांच्या गटात राजेंद्र शेंदरे मुख्य पायलट म्हणून जबाबदारी सांभाळतील. गुरूदेव नगराळे स्पर्धेचे प्रमुख टाईमकिपर आहेत. दोन्ही गटाच्या दौडीसाठी प्रत्येकी २० डॉक्टर्स तैनात करण्यात आले आहेत. सर्वासाठी पाण्याची व्यवस्था भरतिया वॉटर यांनी केली असून अल्पोपहार अजित बेकरीचे मालक अजित दिवाडकर यांनी प्रायोजित केला आहे. सहभागी स्पर्धकांनी विद्यापीठाचा लॉ कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या शारीरिक शिक्षण विभागातून किंवा क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून त्यांचे चेस्ट क्रमांक उद्या, १० सप्टेंबरला दुपारी दोन ते पाच या वेळेत प्राप्त करावेत. याशिवाय त्याचदिवशी संध्याकाळी सात ते नऊ यावेळेत मुंजे चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र कॉर्नर येथील बुथवरून ते प्राप्त करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा