India fined five runs because of Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोट येथे खेळली जात आहे. या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. रवींद्र जडेजा आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकाच्या जोरावर भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत आहे. या डावादरम्यान अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने मोठी चूक केली आहे. याचे परिणाम संपूर्ण संघाला भोगावे लागले आहेत. रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत असताना १०२ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अश्विनने ही चूक केली. यासाठी पंचांनी भारतीय संघावर ५ धावांचा दंड ठोठावला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
इंग्लंडचा गोलंदाज रेहान अहमद १०२ वे षटक टाकायला आला होता. यादरम्यान अहमदच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने चेंडूवर फटका मारला आणि एकेरी धाव घेतली. या वेळी खेळाडूने चूक केली. अश्विनने खेळपट्टीच्या मध्यातून धावायला सुरुवात केली. कोणत्याही खेळाडूला खेळपट्टीच्या मध्यातून धावण्याची परवानगी नाही, यामुळे खेळपट्टीचे नुकसान होते. असे असूनही, अश्विनने एकेरी घेण्यासाठी खेळपट्टीच्या मध्यभागी धावायला सुरुवात केली, त्यामुळे पंच जोएल विल्सन यांनी भारतीय संघावर ५ धावांचा दंड ठोठावला.
इंग्लंडला मिळणार पाच मोफत धावा –
आता जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरेल, तेव्हा त्यांना पाच मोफत धावा मिळतील. त्यामुळे इंग्लंडचा डाव ५-० ने सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत अश्विनची एक छोटीशी चूक संपूर्ण संघाला महागात पडली आहे. हा सामना जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो मालिकेत २-१ अशी आघाडी घेईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका अद्याप बरोबरीत आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने भारताला धक्का दिला. यानंतर भारताने मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही दमदार पुनरागमन करत विशाखापट्टणम कसोटी जिंकली.
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : पदार्पणवीर सरफराज खानने ‘रनआऊट’च्या वादावर सोडले मौन, रवींद्र जडेजाने मान्य केली चूक
अश्विन इतिहास रचण्याच्या जवळ –
अश्विन कसोटी मालिकेत मोठा पराक्रम करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. अश्विनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ४९९ विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत राजकोट कसोटीत एक विकेट घेऊन अश्विन कसोटीतील ५०० विकेट पूर्ण करेल. अश्विनशिवाय अनिल कुंबळे हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा टप्पा ओलांडला आहे. आता एक विकेट घेतल्यानंतर अश्विनही या यादीत सामील होईल.
हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : सरफराजच्या धावबादनंतर रोहित शर्मा जडेजावर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
तिसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे, तर दुपारच्या जेवणानंतर दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला आहे. भारताची धावसंख्या ११५ षटकानंतर ७ बाद ३९४ धावा आहे. अश्विन ३० धावा करून क्रीजवर आहे, तर ध्रुव जुरेलने ३२ धावा केल्या आहेत. आतापर्यंत या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी झाली आहे.