Sunil Gavaskar on Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्रा, नवोदित बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद आणि बॅडमिंटन स्टार एच.एस. प्रणॉय यांच्या कामगिरीचे कौतुक करताना, अनुभवी माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर त्यांचे कौतुक करताना मोठे विधान केले आहे. नीरजच्या यशानंतर सोमवारी बोलताना ते म्हणाले की, “येत्या १०-१५ वर्षांत भारत एक क्रीडा राष्ट्र म्हणून ओळखला जाईल.” नीरज चोप्रा रविवारी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय अॅथलीट ठरला आहे.
१८ वर्षीय प्रज्ञानंदने गेल्या आठवड्यात बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला. एच.एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आणि जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर एक्सेलसेनचा अफलातून पराभव केला. या गेल्या काही दिवसात होत असलेल्या क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहता भारत एक स्पोर्टिंग देश होईल असे मत लिटिल मास्टर गावसकर यांनी मांडले.
नीरज चोप्रा वर्ल्ड चॅम्पियन झाल्याचे पाहून गावसकरांना झाला खूप आनंद
हंगेरी येथील बुडापेस्टमध्ये नीरज चोप्रा विश्वविजेता झाल्याचे पाहून भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना गगनात आनंद मावत नव्हता. ते म्हणाले, “मला आठवते की जेव्हा नीरज चोप्राने ‘ऑलिम्पिक’मध्ये सुवर्णपदक जिंकले तेव्हा भारत आणि इंग्लंडमध्ये मालिका सुरू होती. मी इंग्लंडमधून हे सर्व पाहत होतो आणि चोप्राने सुवर्णपदक जिंकताच मी गाणे गायला सुरूवात केली होती, ‘मेरे देश की धरती सोना उगले…’ तीच भावना मला कालही जाणवली आणि तेच गाणे मी गायले.”
सुनील गावसकर काय म्हणाले नीरज चोप्रा बद्दल?
सुनील गावसकर म्हणाले, “आम्ही दोन वर्षांपूर्वी नीरजला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताना पाहिले होते. गेल्या वर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते, मात्र सुवर्णपदक जिंकणे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते आणि त्यात तो यावेळी यशस्वी झाला. जर तुम्ही अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला क्रीडा राष्ट्र मानले तर मला वाटते येत्या १०-१५ वर्षात भारतालाही क्रीडा राष्ट्र म्हणून संबोधले जाईल.”
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८७.८२ मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी, झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने ८६.६७ मीटरची सर्वोत्तम थ्रो करून कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरीत नीरजसोबत डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन भारतीय खेळाडू होते. किशोरने ८४.७७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पाचव्या स्थानावर तर डीपी मनूने ८४.१४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.