India vs West Indies 2nd ODI Playing 11 Prediction: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२९ जुलै) ब्रिजटाऊन येथील किंग्स्टन ओव्हलवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकला होता, त्यामुळे त्यांचे मनोबल खूप उंचावले आहे. आता जर रोहित ब्रिगेडने हा सामना जिंकला तर ते मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुसरा एकदिवसीय सामना संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल.
जर भारताने दुसरी वन डे जिंकली तर ते विंडीजविरुद्ध सलग १३वी वन डे मालिका जिंकतील. २००६-०७ पासून भारताने वेस्ट इंडीजवर आपले वर्चस्व कायम राखले आहे आणि पुढे देखील असेच कायम राहिला. मात्र, विंडीजचा संघ ज्याप्रकारे खेळतो, ज्या संकटातून जात आहे, त्यामुळे त्यांना टीम इंडियाचे हे आव्हान पेलणे कठीण जात आहे. असे जरी असले तरी ५ ऑक्टोबरपासून सुरू होणारा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून या सामन्यात सूर्यकुमार यादवचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे त्याला फॉर्ममध्ये येणे आणि धावा करणे आवश्यक आहे.
सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यात २५ चेंडूत १९ धावा केल्या होत्या. तो टी२० मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याचा एक्स-फॅक्टर या फॉरमॅटमध्ये स्पष्टपणे दिसतो, पण त्याला वन डे वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठी या फॉरमॅटमध्येही धावा कराव्या लागतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो सलग तीन सामन्यांत पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जर श्रेयस अय्यर तंदुरुस्त असेल तर चौथ्या क्रमांकासाठी त्याला या फलंदाजाचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे त्यासाठी त्याला अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. अशा स्थितीत सूर्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या वन डेत धावा करून आत्मविश्वास वाढवण्याची मोठी संधी आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाकडे पाहता वेस्ट इंडिजविरुद्धची ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. या विश्वचषकासाठी संतुलित कॉम्बिनेशन तयार करणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. वळण घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी करून भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. वळण घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर जर भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या करताना अडचणी येत असतील तर टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा आहे. आगामी विश्वचषकात घरच्या मैदानावरही अशाच खेळपट्ट्या असणार आहेत.
सूर्यकुमार यादवला ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या टी२० फॉर्मची झलक दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरुवारी (२७ जुलै) त्याला सुवर्ण संधी मिळाली होती आणि तो चांगलाच लयीत दिसत होता, पण गुडाकेश मोतीच्या चेंडूवर स्वीप शॉट मारण्याच्या नादात तो बाद झाला. सूर्यकुमारला माहीत आहे की श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल तंदुरुस्त होऊन परतले तर विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघात त्याला स्थान मिळवणे कठीण होईल.
प्लेइंग-११ मध्ये संजू-चहलची होणार एन्ट्री?
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग-११ मध्ये फारसा प्रयोग पाहायला मिळत नाही. तसे, इशान किशन किंवा सूर्यकुमार यादवच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला खेळण्याचा पर्याय भारताकडे आहे. त्याचवेळी, पहिल्या एकदिवसीय सामन्यातील वळणावळणाची खेळपट्टी पाहता संघ व्यवस्थापन वेगवान गोलंदाजाच्या जागी लेग-स्पिनर युजवेंद्र चहलचा समावेश करण्याचा विचार करू शकते. दुसरीकडे, वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-११ मध्ये अल्झारी जोसेफची एन्ट्री होऊ शकते.
फिरकीपटू पुन्हा जादू दाखवणार
पाहिले तर किंग्स्टन ओव्हलची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पूर्णपणे योग्य मानली जात होती, परंतु आता परिस्थिती खूप बदलली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान येथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फायदेशीर दिसत होती. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या टर्निंग आणि उसळत्या चेंडूंपुढे कॅरेबियन फलंदाज गारद झाले. नवीन चेंडूने फलंदाजांना अडचणीत आणण्यात हार्दिक पांड्याही यशस्वी ठरला, दुसरीकडे उमरान मलिकने बरेच चेंडू वेगाने आणि योग्य दिशेने टाकले.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, अॅलिक अथानाज, शाई होप (कर्णधार/यष्टीरक्षक), केसी कार्टी, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, डॉमिनिक ड्रॅक्स, यानिक करियाह, गुडाकेश मोती, जयडेन सील्स.
एका संघाविरुद्ध सलग एकदिवसीय मालिका जिंकली
१२ भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (२००७-२०२२*)
११ पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (१९९६-२०२१)
१० पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (१९९९-२०२२)
९ दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे (१९९५-२०१८)
९ भारत विरुद्ध श्रीलंका (२००७-२०२१)