India vs Australia: आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ केवळ दोन प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. जसप्रीत बुमराहसह सिराजला संघात स्थान देण्यात आले. याशिवाय सिराजच्या अनुपस्थितीतच शमीचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, अलीकडेच माजी भारतीय खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा याने विश्वचषकात भारतीय संघ तिन्ही वेगवान गोलंदाजांना एकत्र खेळवणार नाही, असे मत व्यक्त केले.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “मला वाटते की भारतीय संघ अजूनही क्रमांक आठवर कोण अष्टपैलू खेळाडू फलंदाजी करू शकतो असा विचार करत आहे. त्यांचे हे वेडेपणच या तीन वेगवान गोलंदाजांना एकत्र मैदानात उतरवणार नाही. तिसरा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर असण्याची शक्यता असून गरज भासल्यास तिसरा फिरकी गोलंदाज अक्षर किंवा अश्विन असू शकतो. मात्र, तरीही मोहम्मद शमीला प्लेईंग-११मध्ये संधी मिळावी.”
आशिया चषकापूर्वी पासूनच भारतीय संघ विश्वचषकाची तयारी करत असून आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीच्या सखोलतेवर नेहमीच भर देत आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने शार्दुल ठाकूर किंवा अक्षर पटेल यांचा आठव्या क्रमांकावर समावेश केला होता. विश्वचषकातही असेच काही घडण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराजचा मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून प्लेईंग ११मध्ये समावेश असेल. मात्र, मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे.
समालोचक आकाश चोप्राने शमीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीचे कौतुक केले. तो म्हणाला, “शमीने रस्त्यांप्रमाणे सपाट असणाऱ्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करून पाच विकेट्स काढल्या. स्टीव्ह स्मिथ ज्या चेंडूवर बाद झाला तोच चेंडू सामन्याला कलाटणी देणारा ठरला, ती खरोखर चांगली गोष्ट आहे. चर्चा होती ती फक्त भारत कोणाला तिघांपैकी संघात खेळवेल? आठव्या क्रमांकावरील फलंदाजाकडून धावा का शमीकडून विकेट्स.”
भारतीय संघ सध्या विश्वचषकाच्या तयारीला अंतिम रूप देत आहे. अक्षर किंवा शार्दुल या दोघांपैकी एकाला आठव्या क्रमांकावर फिट केले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, आशिया चषकात झालेल्या दुखापतीतून अक्षर पटेल अद्याप परतलेला नाही. दुसरीकडे, भारतीय वेगवान त्रिकूट पूर्ण फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट्स घेत स्वत:ला पूर्णपणे सिद्ध केले आहे.
सूर्यकुमारने के.एल. राहुलसोबत पाचव्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. राहुल ५८ धावा करून नाबाद राहिला तर सूर्या ५० धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते ते टीम इंडियाने ५ गडी आणि ८ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. ३१ वर्षीय सूर्यकुमार यादवने आतापर्यंत २८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५.५२च्या सरासरीने आणि १०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ५८७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. याआधी सूर्यकुमारवर वन डे फॉरमॅटमधील खराब कामगिरीमुळे टीका झाली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात सूर्याने अर्धशतक झळकावून विश्वचषकापूर्वी भारताच्या आशा उंचावल्या आहेत.