IND vs PAK, Asia Cup 2023 Scheduled: आशिया चषक आणि विश्वचषकाबाबत पाकिस्तानचे नाटक गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आशिया चषक स्पर्धा जरी हायब्रीड मॉडेलवर निश्चित करण्यात आली असली, तरी पाकिस्तान त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. तिकडे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी सांगितले होते की, “जर टीम इंडिया इथे खेळायला आली नाही तर विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला भारतात जाण्यास पुन्हा विरोध करीन. पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी तटस्थ ठिकाणी सामन्याची मागणी करेल. पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. काहीही झाले तरी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे धुमाळ यांनी म्हटले आहे.
आशिया कप २०२३च्या यजमानपदावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. डरबनमध्ये झालेल्या बैठकीनंतर पीसीबीने हायब्रीड मॉडेलनुसार खेळण्याचे मान्य केले आहे. दरम्यान, पाकिस्तानी मीडियामध्ये अशा काही बातम्या आल्या, ज्यात असे म्हटले गेले की BCCI सचिव जय शाह आशिया कप २०२३ (जय शाह पाकिस्तान प्रवास) दरम्यान पाकिस्तानला भेट देतील. मात्र, खुद्द जय शाह यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. जय शाह यांनी बुधवारी सकाळी न्यूज१८ क्रिकेट नेक्स्टला सांगितले की, “मी असे कोणत्याही प्रकारचे विधान केले नाही. या गोष्टीशी सहमत नाही, पाकिस्तानी मीडिया चुकीचा प्रचार करत आहे. मला वाटते हे शक्यतो हेतुपुरस्सर किंवा चीथावण्यासाठी केले. मी पाकिस्तानला अजिबात भेट देणार नाही.”
काय होती पाकिस्तानच्या क्रीडा मंत्र्याचे वक्तव्य?
पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांचाही या समितीत समावेश आहे. त्यांनी अलीकडेच एक भारताला धमकावणारे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, “पीसीबी माझ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने, जर भारताने आशिया चषकाचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली, तर आम्ही देखील आमचे वर्ल्डकपचे सामने तटस्थ ठिकाणी खेळू. जागतिक स्तरावर तशी मागणी करू, झका अश्रफ आयसीसी बोर्डाच्या बैठकीत याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, पाकिस्तानने भारतात न येण्याच्या वारंवार दिलेल्या धमकीवर आयसीसीनेही एकदा पीसीबीला ताकीद दिली होती. “पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी करार केला आहे”, असे ते म्हणाले होते. “आम्हाला आशा आहे की, ते हा करार मोडणार नाही आणि भारतात येतील.”
आशिया कपचे वेळापत्रक लवकरच होणार निश्चित, स्पर्धा केवळ हायब्रीड मॉडेलवर
धुमाळ सध्या आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी (CEC) डरबन मध्ये आहेत. त्यांनी पुष्टी केली की, “बीसीसीआय सचिव जय शाह आणि पीसीबीचे प्रतिनिधी प्रमुख झका अश्रफ यांनी वेळापत्रक अंतिम करण्यासाठी गुरुवारच्या आयसीसी बोर्ड बैठकीपूर्वी भेट घेतली.” धुमाळ पुढे म्हणाले, “बीसीसीआय सचिवांनी पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांची भेट घेतली आणि आशिया कपचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. या स्पर्धेबद्दल आधी चर्चा केली होती, तीच चर्चा सुरू आहे. साखळी फेरीतील चार सामने हे पाकिस्तानमध्ये होतील आणि उर्वरित नऊ सामने हे श्रीलंकेत खेळवले जातील. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दोन्ही सामन्यांचा समावेश आहे. दोन्ही संघ अंतिम सामना खेळल्यास तिसरा सामनाही श्रीलंकेत खेळवला जाईल.”
अश्रफ यांनी पाकिस्तानी मीडियाला सांगितले की, “ही चांगली सुरुवात असून आम्ही आणखी बैठका घेण्याचे आणि संबंध सुधारण्याचे मान्य केले आहे.” गेल्या अनेक महिन्यांपासून स्पर्धेच्या यजमानपदावरून सुरू असलेल्या वादावर दोन्ही बाजूंनी परस्पर सहमतीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी, पीसीबीचे तत्कालीन प्रमुख नजम सेठी यांनी प्राथमिक आक्षेपानंतर दावा केला होता की पीसीबी एसीसीचे प्रस्तावित हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यात आनंदी आहे. पण जेव्हा झका अश्रफ यांनी सेठी यांच्याकडून पीसीबीचा ताबा घेतला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली.
झका अश्रफ यांनी हायब्रीड प्रस्तावावर आक्षेप घेत दावा केला की पाकिस्तानमध्ये फक्त ४ सामने खेळणे त्यांना मान्य नाही, उर्वरित ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. पण आता जेव्हा दोन्ही देशांचे बोर्ड डरबन मध्ये भेटले तेव्हा दोघांनी हायब्रीड मॉडेलवर सहमती दर्शवली आणि आशिया चषक २०२३चे वेळापत्रक १४ जुलै रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.