इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेच्या समारोपानंतर भारतीय खेळाडू आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या ९ जूनपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यासारख्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांची इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी निवड झाली आहे. याशिवाय ते इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांतही खेळताना दिसणार आहेत. भारताचा यावेळचा इंग्लंड दौरा विशेष ठरणार आहे. या दौऱ्यात भारतीय खेळाडू एकाच दिवशी दोन सामने खेळताना दिसणार आहेत.

भारतीय टी ट्वेंटी संघ २६ आणि २८ जून रोजी आयर्लंड विरुद्ध दोन सामने खेळणार आहे. जेव्हा टी ट्वेटी संघ डब्लिन येथे आयर्लंडशी सामना करेल, त्याच दिवशी कसोटी संघाचे सदस्य लीसेस्टरच्या ग्रेस रोड येथे लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळतील. म्हणजे भारतीय खेळाडू एकाच दिवशी दोन वेगवेगळे सामने खेळताना दिसतील. एका आठवड्यानंतर पुन्हा अशीच स्थिती उद्भवेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना १ ते ५ जुलै दरम्यान बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. त्यावेळी एक टी टवेंटी संघ डर्बीशायरविरुद्ध सराव सामना खेळेल. बर्मिंगहॅममध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हा सामना होणार आहे.

त्यानंतर, 3 जुलै रोजी भारतीय टी ट्वेंटी संघ नॉर्थम्प्टन काऊंटी ग्राउंडवर नॉर्थहॅम्प्टनशायर संघाशी भिडणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. ३ जुलै हा कसोटी सामन्याचा तिसरा दिवस असेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सात ते १७ जुलै दरम्यान मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही. मात्र, एकाच वेळी दोन दोन सामने खेळण्याची वेळ आल्यामुळे आयर्लंडविरुद्ध खेळणारे काही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी राष्ट्रीय संघाचा भाग नसतील हे नक्की आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कसोटी संघासोबत इंग्लंडमध्ये असतील. अशा परिस्थितीत एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे आयर्लंड दौऱ्यात प्रशिक्षण चमूचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सराव सामन्यांमध्येही ते या भूमिकेत दिसू शकतात.