* पुजाराचे दुसरे द्विशतक, विजयचे दीडशतक
* भारत सर्वबाद ५०३, मॅक्सवेल-डोहर्टीचे ७ बळी
* ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात २ बाद ७४; १९२ धावांनी पिछाडीवर
‘अब आए कांगारू पहाड के निचे’ असे वर्णन दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे करता येईल. चेतेश्वर पुजाराचे दुसरे द्विशतक, मुरली विजयचे दीडशतक, भारताने ५०३ धावांची मजल मारत मिळवलेली २६६ धावांची आघाडी आणि दिवसभरात फिरकीपटूंनी घेतलेले ९ बळी या दिवसांतील ठळक घडामोडी पाहता कांगारू पराभवाच्या चक्रव्ह्य़ूहात सापडले असून भारताने सामन्यावरची पकड मजबूत केली आहे. भारताला मोठय़ा आघाडीची अपेक्षा होती खरी, पण या खेळपट्टीवर मिळालेली २६६ धावांची आघाडी नक्कीच छोटी नाही. तिसऱ्या दिवशी २६६ धावांत एकूण ११ फलंदाज बाद झाले, त्यामुळे भारतीय संघ डावाने सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. सामन्याच्या चौथ्या दिवशी चेंडू अधिक वळेल आणि ऑस्ट्रेलियाला हा सामना वाचवणे अवघड जाईल, असेच चित्र आहे.
तिसऱ्या दिवसांची सुरेख सुरुवात पुजारा आणि विजय या जोडीने केली. दुसऱ्या दिवशी वाढलेला आत्मविश्वास या दोघांच्याही फलंदाजीमध्ये जाणवत होता. सुरुवातीला सावध पवित्रा घेतलेल्या या दोघांनी काही वेळातच आपल्या फलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या लवकर बळी मिळवण्याच्या रणनीतीचे बारा वाजवले. तब्बल २५ षटके ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज बळी मिळवण्यासाठी झगडत राहिले आणि अखेर उपाहाराला पाच षटके बाकी असताना पदार्पणवीर ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर विजय बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने २३ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर १६७ धावांची खेळी साकारली. विजय बाद होण्यापूर्वी पुजाराने याच मॅक्सवेलला ‘मिड विकेट’ला चौकार मारत दुसरे द्विशतक झळकावले. पण विजय बाद झाल्यावर १८ चेंडूंतच पॅटिन्सला ‘पुल’ करण्याच्या नादात पुजाराही बाद झाला, त्याने तब्बल ३० चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २०४ धावा फटकावल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७० धावांची भागीदारी रचली. या दोघांसह भारताने ९ विकेट्स ११६ धावांत गमावल्या.
उपाहारानंतरच्या दुसऱ्याच षटकात पॅटिन्सनला चुकीचा फटका मारण्याच्या नादात सचिन तेंडुलकरने(७) आपली विकेट गमावली. त्यानंतर आपल्या धडाकेबाज शैलीत महेंद्रसिंग धोनीने (४४) फटकेबाजी केली, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. धोनी बाद झाल्यावर भारतीय फलंदाज एकामागून एक तंबूत परतत गेले आणि भारताचा डाव ५०३ धावांवर संपुष्टात आला. मॅक्सवेलने यावेळी चार आणि झेव्हियर डोहर्टी याने तीन बळी मिळवत भारताला गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे या सामन्यात ‘ऑफ -स्पिनर नॅथन लिऑनची उणीव या दोघांनीही भरुन काढली.
पहिल्या डावात दुहेरी धावसंख्या उभारता न आलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि ईडी कोवन यांनी संघाला ५६ धावांची सलामी दिली. पहिल्याच षटकात कोवनने भुवनेश्वरला चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले, यामध्ये वॉर्नरही मागे नव्हताच. ९१ चेंडूंत या दोघांनी संघाचे अर्धशतक फलकावर लावले. पाणपोईच्या विश्रामानंतरच्या दुसऱ्याच षटकात अश्विनला ‘स्विप’मारण्याच्या नादात वार्नरने आपली डावी यष्टी गमावली, त्यानंतर फिलीप ह्य़ुजेसनेही तीच चूक करत एकही धाव न करता आपली विकेट गमावली. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची २ बाद ७४ अशी अवस्था असून ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या वस्त्रहरणातून वाचवणारा श्रीकृष्ण सापडतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९ बाद २३७ (डाव घोषित)
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. कोवन गो. मॅक्सवेल १६७, वीरेंद्र सेहवाग झे. वेड गो. सिडल ६, चेतेश्वर पुजारा झे. डोहर्टी गो. पॅटिन्सन २०४, सचिन तेंडुलकर झे. वेड गो. पॅटिन्सन ७, विराट कोहली झे. कोवन गो. मॅक्सवेल ३४, महेंद्रसिंग धोनी गो. डोहर्टी गो. मॅक्सवेल ४४, रवींद्र जडेजा झे. व गो. मॅक्सवेल १०, आर. अश्विन झे. ह्य़ुजेस गो. डोहर्टी १, हरभजन सिंग झे. मॅक्सवेल गो. डोहर्टी ०, भुवनेश्वर कुमार यष्टीचीत वेड गो. डोहर्टी १०, इशांत शर्मा नाबाद २,  अवांतर (बाइज १, लेग बाइज १३, वाइड ४) १८, एकूण १५४.१ षटकांत सर्व बाद ५०३.
बाद क्रम : १-१७. २- ३८७, ३-३९३, ४- ४०४, ५- ४६०, ६- ४८४, ७-४८५, ८- ४८९, ९- ४९१, १०-५०३.
गोलंदाजी : जेम्स पॅटिन्सन २९-११-८०-२, पीटर सिडल ३१-६-९२-१, मोझेस हेन्रिक्स २१-७-४५-०, झेव्हियर डोहर्टी ४६.१-१५-१३१-३, ग्लेन मॅक्सवेल २६-२-१२७-४, डेव्हिड वॉर्नर १-०-१४-०.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ईडी कोवन खेळत आहे २६, डेव्हिन वॉर्नर त्रि.गो. अश्विन २६, फिलीप ह्य़ुजेस त्रि.गो. अश्विन ०, शेन वॉटसन खेळत आहे ९, अवांतर (बाइज ७, लेग बाइज ६) १३, एकूण ३२ षटकांत २ बाद ७४.
बाद क्रम : १- ५६, २- ५६.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ६-४-७-०, आर. अश्विन १५-६-४२-२, हरभजन सिंग ८-५-१०-०, रवींद्र जडेजा ३-२-२-०.
‘‘फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी, याचे सखोल ज्ञान ऑस्ट्रेलियाच्या संघाला नाही. पण त्यांची बलस्थाने आणि कच्चे दुवे काय आहेत, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही यशस्वी ठरलो असून फिरकीपटूंनी त्यांची भेदक गोलंदाजी कायम ठेवायला हवी. यापूर्वी या मैदानात खेळल्यामुळे खेळपट्टी कशी असेल याचा अंदाज मला होता आणि त्याचाच फायदा झाला. माझ्याबरोबरच मुरली विजयची खेळीही तितकीच महत्त्वाची आहे. दुखापतीतून मैदानात परतल्यावर साकारलेली ही खेळी समाधान देणारी आहे, त्यामुळे या द्विशतकाचा आनंद काही औरच आहे. फिरकीला पोषक खेळपट्टीवर नॅथन लिऑनला वगळण्याचा निर्णय आम्हाला अनपेक्षित होता. पण ग्लेन मॅक्सवेलने त्याची उणीव भरून काढली.’’
चेतेश्वर पुजारा, भारताचा फलंदाज
पुजारा-विजयची सर्वोत्तम भागीदारी
पुजारा आणि विजय यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७० धावांची सर्वोत्तम भागीदारी उभारण्याचा मान पटकावला.
 यापूर्वी दुसऱ्या विकेटसाठी सुनील गावस्कर (१८२) आणि दिलीप वेंगसकर (१५७) यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे ३४४ धावांची भागीदारी उभारली होती.
 व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी ईडन गार्डनवरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध उभारलेली सर्वोत्तम ३७६ धावांची भागीदारी पार करता आली नाही.
तिसऱ्या दिवसअखेर
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९ बाद २३७ (डाव घोषित)
भारत (पहिला डाव) :  सर्व बाद ५०३
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : २ बाद ७४
सत्र        धावा/बळी
पहिले सत्र    ८९/२
दुसरे सत्र    १०३/७
तिसरे सत्र     ७४/२