डी’व्हिलियर्सची शतकी झुंज व्यर्थ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने चेन्नईत ‘विजयादशमी’ साजरी केली. विश्वचषकानंतर लय हरवलेल्या विराटने दसऱ्याच्या मुहूर्तावर खणखणीत शतक लगावले आणि भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर तीनशे धावांचे लक्ष्य ठेवले. ए बी डी‘व्हिलियर्सने शतक झळकावत एकाकी झुंज दिली, मात्र ती अपुरीच ठरली आणि भारताने ३५ धावांनी विजय साकारला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. आता रविवारी मुंबईत होणारा पाचवा आणि अंतिम सामना हा निर्णायक ठरणार आहे.
भारताच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने हशिम अमलाला झटपट गमावले. तर अक्षर पटेलने फॅफ डू प्लेसिसला फिरकीच्या जाळ्यात फसवले. भारताविरुद्ध सातत्याने धावा करणाऱ्या क्विंटन डी कॉकला हरभजनने माघारी धाडले. त्याने ३५ चेंडूंत ४३ धावांची खेळी केली. पाठोपाठ मिलरला तंबूचा रस्ता दाखवत हरभजनने आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. चाचपडत खेळणाऱ्या फरहान बेहरादिनची खेळी अमित मिश्राने संपुष्टात आणली. एकामागोमाग एक सहकारी बाद होत असतानाही डी’व्हिलियर्सने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. मिश्राच्या गोलंदाजीवर षटकार लगावत डी’व्हिलियर्सने २२व्या शतकाची नोंद केली. धावगतीचे आव्हान वाढत असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डी’व्हिलियर्स बाद झाला. त्याने १० चौकार आणि २ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली. निर्धारित षटकांत दक्षिण आफ्रिकेला २६४ धावाच करता आल्या. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ बळी घेतले. शतकी खेळी करणाऱ्या विराटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारताने २९९ धावांची मजल मारली. आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोहलीने १४० चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांसह १३८ धावांची शानदार खेळी साकारली. फेब्रुवारी महिन्यात विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत अॅडलेडला पाकिस्तानविरुद्ध त्याने याआधीचे शतक ठोकले होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरल्यानंतर कोहलीने अजिंक्य रहाणे (४५) सोबत तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचली. डेल स्टेनने रहाणेला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ४५ धावा केल्या. तीन सामन्यात मिळून तीन धावा करणाऱ्या सुरेश रैनाने कोहलीला सुरेख साथ दिली. रैना-कोहली जोडीने चौथ्या विकेटसाठी त्याने १८.४ षटकांत १२७ धावांची भागीदारी केली. फांगिसोला लाँग ऑनच्या दिशेने षटकार खेचून त्याने शतकावर शिक्कामोर्तब केले. रैनाने ५२ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावा केल्या. शेवटच्या पाच षटकात आफ्रिकेच्या टिच्चून गोलंदाजीमुळे भारताला २९ धावाच करता आल्या. डेल स्टेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
वातावरण अतिशय उष्ण असल्याने धावा करणे खडतर होते. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत होते, चौकार लगावणे कठीण होते. म्हणूनच सुरुवातीला एकेरी-दुहेरी धावांवर भर दिला. शतक झळकावल्यानंतर संघाने विजय मिळवल्यास आनंद द्विगुणित होतो. संघाच्या विजयात योगदान देण्याचा आनंद अनोखा आहे. ए बी डी’व्हिलियर्स एकहाती सामना फिरवू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट्स मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. खेळताना स्नायू दुखावले होते, मात्र आता काही समस्या नाही.
– विराट कोहली
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. डू प्लेसिस गो. मॉरिस २१, शिखर धवन झे. डी कॉक गो. रबाडा ७, विराट कोहली झे. डी कॉक गो. रबाडा १३८, अजिंक्य रहाणे झे. डी कॉक गो. स्टेन ४५, सुरेश रैना झे. डी’व्हिलियर्स गो. स्टेन ५३, महेंद्रसिंग धोनी झे. डी’व्हिलियर्स गो. स्टेन १५, हरभजन सिंग त्रि. गो. रबाडा ०, अक्षर पटेल नाबाद ४, भुवनेश्वर कुमार धावचीत ०, अवांतर (लेगबाइज ३, वाइड १२, नोबॉल १) १६, एकूण ५० षटकांत ८ बाद २९९
बाद क्रम : १-२८, २-३५, ३-१३९, ४-२६६, ५-२९१, ६-२९१, ७-२९९, ८-२९९
गोलंदाजी : डेल स्टेन १०-०-६१-३, कॅगिसो रबाडा १०-०-५४-३, ख्रिस मॉरिस ९-०-५५-१, आरोन फांगिसो ९-०-५१-०, इम्रान ताहीर ९-०-५८-०, फरहान बेहरादिन
३-०-१७-०
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक झे. रहाणे गो. हरभजन ४३, हशिम अमला झे. धवन गो. मोहित ७, फॅफ डू प्लेसिस झे. धोनी गो. पटेल १७, ए बी डी’व्हिलियर्स झे. धोनी गो. कुमार ११२, डेव्हिड मिलर पायचीत गो. हरभजन ६, फरहान बेहरादिन पायचीत गो. मिश्रा २२, ख्रिस मॉरिस धावचीत ९, आरोन फांगिसो झे. पटेल गो. कुमार २०, डेल स्टेन झे. रहाणे गो. कुमार ६, कागिसो रबाडा नाबाद ८, इम्रान ताहीर नाबाद ४, अवांतर (लेगबाइज ३, वाइड ५, नोबॉल २) १०, एकूण ५० षटकांत ९ बाद २६४
बाद क्रम : १-३६, २-६७, ३-७९, ४-८८, ५-१४४, ६-१८५, ७-२३३, ८-२५०, ९-२५०
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-६८-३, मोहित शर्मा १०-०-४८-१, हरभजन सिंग १०-०-५०-२, अक्षर पटेल १०-०-४०-१, अमित मिश्रा १०-१-५५-१
सामनावीर : विराट कोहली