पाचव्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने गुरुवारी दोन सुवर्णपदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली. तिरंदाजीमध्ये मुलींच्या रिकव्‍‌र्ह प्रकारामध्ये प्राची सिंहने सुवर्णपदक पटकावले, तर टेनिसमध्ये मिश्र दुहेरी विभागामध्ये ससीकुमार मुकुंद आणि ध्रुथी तताचर यांनीही सुवर्णपदक मिळवले. स्पर्धेचा समारोप व्हायला अजून एक दिवस बाकी असून भारताने आतापर्यंत सहावे स्थान पटकावले आहे. भारताने आतापर्यंत एकूण १७ पदकांची कमाई केली असून यामध्ये ७ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कांस्यपदकांचा समावेश आहे.

बॉक्सिंगपटू गौरव सोळंकीने ५२ किलो वजनी गटामध्ये रौप्यपदक पटकावले. तिरंदाजीमध्ये मुलांच्या निशांत कुमावतने रौप्यपदक मिळवले. त्याचबरोबर स्क्वॉशमध्ये मुलांच्या मिश्र दुहेरी प्रकारात व्हेलावन सेंथिल कुमार आणि हर्षित जवांडा यांनी रौप्यपदकाची कमाई केली. बॉक्सिंगमध्ये मुलांच्या गटात लिइचोमबाम भीमचंद सिंग (४९ कि.) आणि प्रयाग चौहान (६४ कि.) यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
तिरंदाजपटू प्राचीने बांगलादेशच्या नोंदिनी खान शोप्नाला अंतिम फेरीत पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. टेनिसमध्ये मिश्र दुहेरीमध्ये ससीकुमार आणि ध्रुथी यांनी अंतिम फेरीत स्कॉटलंडच्या लोई-अडा-मॅक्लेलॅण्ड आणि इवेन लुम्सेडेन यांना ७-६(४), ६-३ असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. बॉक्सिंगपटू गौरव सोळंकीला (५२ कि.) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जॅक बोवेनने गौरवला ३-० असे पराभूत केले. या स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगपटूकडून झालेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

Story img Loader