विश्वविजेतेपद माझ्यासाठी सदैव स्मरणात राहणार आहे. मुंबईतील अभूतपूर्व स्वागतामुळे मी खूप भारावलो आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे भारतीय युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याने सांगितले.

शॉ म्हणाला, ‘‘मी विरार येथे राहतो. तेथून वेगवेगळ्या मैदानांवर सामने खेळण्यासाठी माझ्यापेक्षा मला घेऊन येणाऱ्या वडिलांना दररोज किती यातना होत होत्या हे सांगणे कठीण आहे. माझ्या या संघर्षपूर्ण वाटचालीत ज्यांनी ज्यांनी मला थेट किंवा अप्रत्यक्षपणे मदत केली, त्यांचा मी ऋणी आहे. मुंबई संघात स्थान मिळवणे हीदेखील एक कसोटीच असते. भारतीय संघातील स्थान म्हणजे खूपच अलौकिक कामगिरी करण्याची गरज असते. मी सदैव त्याच हेतूने खेळत राहिलो आणि आणखीही खेळत राहणार आहे.’’

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी सामन्यात विजय मिळवल्यानंतर पुन्हा अंतिम सामन्यात त्यांच्याविरुद्ध खेळण्याची मानसिक तयारी झाली होती, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडू कधीही सामन्यास कलाटणी देऊ शकतात, त्यामुळेच शेवटपर्यंत फाजील आत्मविश्वास न ठेवता खेळण्याचे आमचे ध्येय होते. अंतिम फेरीत स्थान मिळवल्यानंतर आता अजिंक्यपदावर नाव कोरण्याचे लक्ष्य माझ्यासह संघातील सर्वच खेळाडूंचे होते. आम्ही या सामन्याबाबत नियोजन केले होते. त्यानुसार होत गेले व तुलनेने आम्ही हा सामना एकतर्फी जिंकल्यामुळे आम्हाला जास्त आनंद झाला,’’ असे शॉ याने सांगितले.

Story img Loader