INDW vs SAW Test Match Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर एका सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ५२५ धावा होती. तर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने ६ गडी गमावून ६०३ धावांवर पहिला डाव घोषित केला. यासह भारतीय संघाने महिला कसोटी क्रिकेटच्या ९० वर्षांच्या इतिहासात प्रथमच मोठी कामगिरी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. ज्यात शेफाली वर्माने कसोटीमधील पहिले द्विशतक झळकावले, तर उपकर्णधार स्मृती मानधानानेही शतकी कामगिरी केली. शेफाली वर्माने २०५ धावांची तर स्मृती मानधना हिने १४९ धावांची खेळी केली. याशिवाय जेमिमा रॉड्रीग्जने ५५ धावा, ऋचा घोषने ८६ धावा तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ६९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. भारताच्या सर्वच फलंदाजांनी शतक, अर्धशतक झळकावत ६०३ धावांचा मोठा डोंगर उभारला. यासह महिलांच्या कसोटीमध्ये इतकी मोठी धावसंख्या रचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.

हेही वाचा – IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच, एखाद्या संघाने एका डावात ६०० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर नोंदवला गेला आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाच्या नावावर होता, ज्यांनी २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पर्थ येथे झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ५७५ धावा केल्या होत्या.

६०० धावांच्या मोठ्या धावसंख्येसह भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वविक्रम केला. महिला कसोटी क्रिकेटची सुरुवात १९३४ मध्ये झाली. एखाद्या संघाने ६०० धावांचा टप्पा ओलांडण्याची ९० वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा – “विराटबद्दल तर बोलूच नका…”, वर्ल्डकपमध्ये फॉर्मात नसलेल्या कोहलीवर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य, म्हणाले; “३-४ सामने”

महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एका डावातील सर्वोच्च धावसंख्या
भारत – ६०३ धावा (वि दक्षिण आफ्रिका, चेन्नई कसोटी सामना, २०२४)

ऑस्ट्रेलिया – ५७५ धावा (वि दक्षिण आफ्रिका, पर्थ कसोटी सामना, 2023)

ऑस्ट्रेलिया – ५६९ धावा (वि. इंग्लंड, गिल्डफोर्ड कसोटी सामना, १९९८)

ऑस्ट्रेलिया – ५२५ धावा (वि. भारत, अहमदाबाद कसोटी सामना, १९८४)

न्यूझीलंड – ५१७ धावा (वि. इंग्लंड, स्कारबोरो कसोटी सामना, १९९६)