भारतीय महिला क्रिकेट संघाने यास्तिका भाटिया आणि शफाली वर्माच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाचा २ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने हे लक्ष्य ४९.३ षटकांत आठ गडी गमावून साध्य केले. भारताकडून सलामीवीर शफाली वर्माने ५६ आणि यास्तिका भाटियाने ६४ धावांची मौल्यवान खेळी खेळली. वनडेमधील दोन्ही खेळाडूंचे हे पहिले अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलियन संघाला वनडेमध्ये ४ वर्षानंतर पराभूत करण्यात भारतीय संघ यशस्वी झाला. यासह मिताली अँड कंपनीने ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखला. ऑस्ट्रेलियाचा संघ शेवटच्या २६ एकदिवसीय सामन्यांपासून अजिंक्य होता.

यास्तिकाने तिच्या डावात नऊ चौकार तर शफालीने सात चौकार ठोकले. शेवटी, दीप्ती शर्माने ३० चेंडूत ३१ धावा केल्या आणि स्नेह राणाने २७ चेंडूत ३० धावा खेळण्याव्यतिरिक्त सातव्या विकेटसाठी ३३ धावा जोडून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. भारताने ४७व्या षटकात दीप्तीची विकेट गमावली.

निकोला केरीने स्नेहला ४९व्या षटकात बाद केले पण अनुभवी झुलन गोस्वामीने शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँडने ३० धावांत ३ बळी घेतले.

हेही वाचा – IPL 2021 : …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता!

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने ९ बाद २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघ षटकात ४ बाद ८७ धावांवर संकटात सापडला होता पण एश्लेग गार्डनर (६७) आणि बेथ मूनी (५२) यांनी संघाला सावरले. ताहलिया मॅकग्रानेही ४७ धावांची शानदार खेळी खेळली. भारतासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ३७ धावांत ३ तर पूजा वस्त्राकरने ४६ धावांत ३ बळी घेतले. झुलनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Story img Loader