नवी दिल्ली : दीप्ती शर्माच्या (६७ धावा आणि पाच बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. शुक्रवारी, सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची दुसऱ्या डावात ६ बाद १८६ अशी धावसंख्या होती आणि भारताकडे एकूण ४७८ धावांची मोठी आघाडी होती.
नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडवर वर्चस्व गाजवले. सुरुवातीला ७ बाद ४१० धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताचा पहिला डाव ४२८ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करताना इंग्लंडला केवळ १३६ धावांत गुंडाळले. त्यामुळे पहिल्या डावात भारताला २९२ धावांची भक्कम आघाडी मिळाली. यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी बरीच चर्चा केली व इंग्लंडला फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला.
हेही वाचा >>> “तू नेहमीच आमचा कर्णधार राहशील, तुझा वारसा…”, रोहित शर्माबद्दल मुंबई इंडियन्सनं शेअर केला भावनिक VIDEO
दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात ६ बाद १८६ धावा केल्या होत्या. हरमनप्रीत (नाबाद ४४) आणि पूजा वस्त्रकार (नाबाद १७) खेळपट्टीवर होत्या. तसेच शफाली वर्मा (३३), जेमिमा रॉड्रिग्ज (२७) आणि स्मृती मनधाना (२६) यांनीही चांगली फलंदाजी केली.
त्यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला भारताचा पहिला डाव केवळ १८ धावांची भर घालून संपुष्टात आला. दीप्तीने ११३ चेंडूंत ६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने सुरुवातीपासूनच ठरावीक अंतराने फलंदाज गमावल्या. पदार्पणवीर मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरने सोफी डंकलीला (११) त्रिफळाचीत करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर अष्टपैलू वस्त्रकारने इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटला (११) पायचीत केले, तर टॅमी ब्युमॉन्टला (१०) धावचीत केले. तसेच ऑफ-स्पिनर दीप्ती शर्माने डॅनी वॅट (१९), एमी जोन्स (१२) आणि सोफी एक्लेस्टोन (०) यांना खेळपट्टीवर फार काळ टिकू दिले नाही.
एका बाजूने फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या बाजूने नॅट स्किव्हर-ब्रंटने (७० चेंडूंत ५९) आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली. तिने आपल्या अर्धशतकी खेळीत १० चौकार मारले. अखेर फिरकी गोलंदाज स्नेह राणाने स्किव्हर-ब्रंटचा त्रिफळा उडवताना इंग्लंडला सर्वात मोठा झटका दिला. राणाने मग चार्ली डीनला खातेही उघडण्याची संधी दिली नाही. यानंतर दीप्तीने केट क्रॉस (१) आणि लॉरेन फिलेर (५) यांना सलग दोन षटकांत बाद करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक
* भारत (पहिला डाव) : ९४ षटकांत ७ बाद ४१० (शुभा सतीश ६९, जेमिमा रॉड्रिग्ज ६८, दीप्ती शर्मा ६७, यास्तिका भाटिया ६६; लॉरेन बेल ३/६७, सोफी एक्लेस्टोन ३/९१)
* इंग्लंड (पहिला डाव) : ३५.३ षटकांत सर्वबाद १३६ (नॅट स्किव्हर-ब्रंट ५९, डॅनी वॅट १९; दीप्ती शर्मा ५/७, स्नेह राणा २/२५, रेणुका सिंह ठाकूर १/३२, पूजा वस्त्रकार १/३९)
* भारत (दुसरा डाव) : ४२ षटकांत ६ बाद १८६ (हरमनप्रीत कौर नाबाद ४४, शफाली वर्मा ३३; चार्ली डीन ४/६८)