ब्रिस्बेन : सलामीची फलंदाजी जॉर्जिया व्होल (१०१ धावा) आणि अनुभवी एलिस पेरी (१०५) यांना रोखण्यात आलेल्या अपयशामुळे भारतीय महिला संघाला रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून १२२ धावांनी हार पत्करावी लागली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांनी निराशा केली होती, तर दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांची हाराकिरी भारताच्या अपयशाचे कारण ठरली.
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ८ बाद ३७१ धावांचा डोंगर उभा केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुरुष किंवा महिला ऑस्ट्रेलिया संघाची ही भारताविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव ४४.५ षटकांत २४९ धावांत गुंडाळला. यासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी पर्थमध्ये होणार आहे.
संक्षिप्त धावफलकऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ८ बाद ३७१ (एलिस पेरी १०५, जॉर्जिया व्होल १०१, फोबी लिचफिल्ड ६०; सैमा ठाकोर ३/६२) विजयी वि. भारत : ४४.५ षटकांत सर्वबाद २४९ (रिचा घोष ५४, मिन्नू मणी नाबाद ४६, जेमिमा रॉड्रिग्ज ४३; अॅनाबेल सदरलँड ४/३९, अलाना किंग १/२५)