मुंबई : नॅट स्किव्हर-ब्रंट (५३ चेंडूंत ७७ धावा) व डॅनिएले वॅट (४७ चेंडूंत ७५ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीनंतर फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनच्या (१५ धावांत ३ बळी) प्रभावी माऱ्याच्या जोरावर इंग्लंडच्या महिला संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतावर ३८ धावांनी विजय मिळवला. या विजयाने इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.
इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १९७ धावा केल्या. भारताला ६ बाद १५९ धावाच करता आल्या. मोठया धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मनधाना (६) लवकर माघारी परतली. मैदानात आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जलाही (४) फार काही करता आले नाही. यानंतर सलामीवीर शफाली वर्मा (५२) व कर्णधार हरमनप्रीत कौर (२६) यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनीही संघाच्या धावसंख्येत भर घातली. मात्र, एक्लेस्टोनने कौरला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. मग, रिचा घोषने (२१) शफालीच्या साथीने संघाचा डाव पुढे नेला. मात्र, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ती बाद झाली. दरम्यान, शफालीने आपले अर्धशतक पूर्ण केले. ती बाद झाल्यानंतर कनिका अहुजा (१५) व पूजा वस्त्रकार (नाबाद ११) यांनी धावा केल्या. मात्र, तोवर उशीर झाला होता. इंग्लंडकडून एक्लेस्टोनला स्किव्हर-ब्रंट (१/३५), साराह ग्लेन (१/२५) यांची साथ मिळाली.
हेही वाचा >>> IND vs SA: टीम इंडियाच्या ‘या’ पाच युवा खेळाडूंवर असणार लक्ष, कोणते आहेत ते खेळाडू? जाणून घ्या
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडची सुरुवातही चांगली झाली नाही. भारताच्या रेणुका सिंह ठाकूरने (३/२७) सोफी डंकली (१) व अॅलिस कॅप्से (०) यांनी बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद २ अशी बिकट केली. मात्र, या स्थितीतून वॅट व स्किव्हर-ब्रंट यांनी संघाला सावरले. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या गडय़ासाठी १३८ धावांची भागीदारी रचत संघाला सुस्थितीत पोहोचवले. वॅटने आपल्या खेळीत आठ चौकार व दोन षटकार झळकावले. तर, स्किव्हर-ब्रंटने १३ चौकार लगावले. या दोघी माघारी परतल्यानंतर एमी जोन्सने ९ चेंडूंत २३ धावा करत संघाला मोठया धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताकडून ठाकूरला श्रेयांका पाटील (२/४४) व सैका इशक (१/३८) यांनी चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : २० षटकांत ६ बाद १९७ (नॅट स्किव्हर-ब्रंट ७७, डॅनिएले वॅट ७५; रेणुका सिंह ठाकूर ३/२७, श्रेयांका पाटील २/४४) विजयी वि. भारत : २० षटकांत ६ बाद १५९ (शफाली वर्मा ५२, हरमनप्रीत कौर २६, रिचा घोष २१; सोफी एक्लेस्टोन ३/१५, साराह ग्लेन १/२५)
सामनावीर : नॅट स्किव्हर ब्रंट