India Women won by 10 wickets against South Africa : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना आज पार पडला. चार दिवस चाललेल्या या सामन्यात टीम इंडियाने १० गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त ३७ धावांची गरज होती, जी त्याने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. भारताने हे लक्ष्य १०व्या षटकातच गाठले आणि मालिका जिंकली. या सामन्यात भारतीय महिला संघाच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली असली तरी गोलंदाज स्नेह राणाने दाखवलेला खेळ वाखाणण्याजोगा होता. या सामन्यात तिने १० विकेट्स घेत इतिहास रचला आहे.
स्नेह राणाने या सामन्यात एकूण १० विकेट्स घेतल्या –
सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना स्नेह राणासमोर तग धरता आला नाही. राणाने २५.३ षटकं गोलंदाजी करताना ७७ धावांत ८ बळी घेतले. यापैकी तिने चार षटके अशा प्रकारे टाकली की एकही धाव दिली नाही. पहिल्याच डावात तिने आठ विकेट घेतल्यावर या सामन्यात ती किमान दहा विकेट्स घेऊ शकते हे जवळपास निश्चित झाले होते. दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन मिळाला, त्यामुळे त्यांना लगेचच फलंदाजीला यावे लागले.
स्नेह राणाने दुसऱ्या डावातही दोन विकेट्स घेतल्या –
दुसऱ्या डावात स्नेह राणाने ४० षटके गोलंदाजी करताना १२ षटकं निर्धाव टाकली आणि १११ धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले. यासह तिच्या १० विकेट्स पूर्ण झाल्या. दुसऱ्या डावात स्नेह राणाच्या दोन विकेट्सशिवाय दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पूजा वस्त्राकर, शफाली वर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. स्नेह राणा व्यतिरिक्त झुलन गोस्वामी ही एकमेव भारतीय गोलंदाज आहे जिने एका कसोटी सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – ‘बुमराहची आई १६-१८ तास काम करायची…’, एका पोस्टने उलगडले जसप्रीतच्या आयुष्यातील सर्वात मोठे भावनिक क्षण
भारताने दहा गडी राखून जिंकला सामना –
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सवर ६०३ धावा करून डाव घोषित केला. यामध्ये शफाली वर्माचे द्विशतक आणि स्मृती मानधनाच्या शतकी खेळीचा समावेश आहे. तर जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी अर्धशतके झळकावली. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २६६ धावांवरच मर्यादित राहिला, त्यामुळे त्यांना फॉलोऑनला सामोरे जावे लागले. यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३७३ धावा केल्या. म्हणजेच भारताला केवळ ३७ धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्याने एकही विकेट न गमावता पूर्ण केले आणि सामना दहा गडी राखून जिंकला.