कोपनहेगन : भारताच्या महिला तिरंदाजांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रिकव्र्ह विभागात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आणि रिओ ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. मात्र भारताच्या पुरुष संघास ही पात्रता पूर्ण करण्यात अपयश आले. दीपिकाकुमारी, लक्ष्मीराणी माझी व रिमिल बुरियुली यांनी सातव्या मानांकित जर्मनीविरुद्ध १-३ अशा पिछाडीवरून ५-३ असा विजय मिळविला. पुरुष गटात राहुल बॅनर्जी, मंगलसिंग चंपिया व जयंत तालुकदार यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने इटलीविरुद्ध ४-२ अशी आघाडी असताना सामना जिंकण्याची संधी गमावली. त्यांनी टायब्रेकरद्वारा २६-२९ असा पराभव स्वीकारला. वैयक्तिक विभागात भारताच्या या तीनही खेळाडूंना ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्याची संधी आहे. वैयक्तिक लढतींना बुधवारी प्रारंभ होत आहे.
महिलांमध्ये पूर्णिमा महातो यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंनी सुरेख खेळ केला.