बीसीसीआयने यावर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे. तर हरमनप्रीत कौरला संघाची उपकर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना ६ मार्च रोजी बे-ओव्हल तौरंगा येथे होणार आहे. हा १५ सदस्यीय संघ विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची वनडे मालिका खेळेल. या मालिकेतील पहिला सामना ११ फेब्रुवारीला होईल.
वर्ल्डकप २०२२ मध्ये भारताचा दुसरा सामना १० मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध, १२ मार्च रोजी वेस्ट इंडिज आणि चौथा सामना १६ मार्च रोजी इंग्लंड विरुद्ध होणार आहे. भारतीय महिला संघ १९ मार्च रोजी ऑकलंडमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. तर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका २२ आणि २७ मार्चला भिडणार आहेत. २०२२ च्या महिला विश्वचषकाची सुरुवात ४ मार्च रोजी यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याने होईल.
हेही वाचा – ऋषभ पंतच्या शॉट सिलेक्शनवर संतापला गौतम गंभीर; म्हणाला, “….हा तर मुर्खपणा”
३१ दिवसांत एकूण ३१ सामने खेळवले जाणार आहेत. ८ संघांमध्ये विश्वविजेता होण्याचा प्रयत्न असेल. स्पर्धेतील सर्व सामने न्यूझीलंडमधील ६ शहरांमध्ये ऑकलंड, ख्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, वेलिंग्टन आणि तौरंगा येथे खेळवले जातील. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपमधील त्यांच्या स्थानांवर आधारित विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. यजमान असताना न्यूझीलंडने या स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे.
२०२२ विश्वचषक आणि न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ:
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघा सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
स्टँडबाय खेळाडू : एकता बिश्त, सिमरन दिल बहादूर आणि साभिनेनी मेघना.