भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्यात जपानला पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं आहे. भारताच्या महिला संघाने जपानवर ४-० अशी मात करत चषकावर आपलं नाव कोरलं. भारतीय महिला संघाने दुसऱ्यांदा हा चषक उंचावला आहे. यापूर्वी उपांत्र फेरीत भारताने दक्षिण कोरियावर २-० अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती. झारखंडची राजधानी रांची येथील मारंग गोमके जयपाल सिंह अॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर भारत आणि जपानमधील अंतिम सामना खेळवण्यात आला होता.
भारताच्या महिला हॉकी संघाने एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावल्यानंतर हॉकी इंडियाने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, सर्व खेळाडूंना प्रत्येकी ३-३ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. त्याचबरोबर संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सर्व सदस्यांना प्रत्येकी १.५ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.
अंतिम सामन्यात भारताकडून संगीता कुमारी हिने १७ व्या मिनिटाला गोल करून भारताचं खातं उघडलं. त्यापाठोपाठ ४६ व्या मिनिटाला नेहाने आणि ५७ व्या मिनिटाला लालरेमसिआमीने गोल करून भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. ६० व्या मिनिटाला वंदना कटारिया हिने भारतासाठी चौथा गोल केला. जपानच्या कोणत्याही खेळाडूला गोल करता आला नाही. या चार गोलसह भारताने जपानवर ४-० अशी मात केली. तत्पूर्वी अंधुक प्रकाशामुळे हा सामना उशिरा सुरू झाला होता.
भारताचं एकतर्फी वर्चस्व
सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी चेंडूवर ताबा ठेवला. तसेच संगीता कुमारीने केलेल्या गोलनंतर सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला. भारतीय खेळाडूंनी आणि गोलकीपर सविता पुनिया हिने जपानी खेळाडूंना शेवटपर्यंत डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. जपानला या सामन्यात अनेक पेनल्टी शूटआऊट मिळाले. परंतु, संघाच्या मदतीने सविताने जपानी खेळाडूंच्या सर्व पेनल्टी अपयशी ठरवल्या आणि एकही गोल होऊ दिला नाही.