U19 T20 Women’s World Cup Final INDW vs SAW Highlights in Marathi: भारतीय १९ वर्षाखालील संघ पुन्हा एकदा विश्वविजेता ठरला आहे. अंडर-१९ टी-२० विश्वचषक २०२५ मध्ये अजिंक्य राहिलेल्या भारताच्या महिला संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका संघाचा ९ विकेट्सने पराभव करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सानिका चाळकेचा विजयी चौकार आणि भारताने सलग दुसऱ्यांदा हे जेतेपद आपल्या नावे केले आहे. भारताच्या या अंतिम फेरीतील विजयात भारताच्या फिरकी त्रिकुटाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज गोंगाडी त्रिशा हिने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने ४० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, याशिवाय तिने गोलंदाजीतही ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय पारूनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा आणि आयुषी या फिरकी त्रिकुटाने भारताचा विजय अधिक सोपा केला.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या विक्रमी कामगिरी करणाऱ्या सलामी जोडीने चांगलीच सुरूवात केली. कमालिनी ८ धावा करत लवकर बाद झाली. यानंतर उपकर्णधार सानिका चाळके आणि गोंगाडी त्रिशा हिने चांगली भागीदारी रचत भारताला मोठा विजय मिळवून दिला. त्रिशाने ३३ चेंडूत ८ चौकारांसह ४४ धावांची नाबाद खेळी केली. तर सानिका चाळकेने २२ चेंडूत ४ चौकारांसह २६ धावांची खेळी केली आणि विजयी चौकारासह भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी पार चुकीचा ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा संघ अवघ्या ८२ धावांत सर्वबाद झाला. २३ धावा ही आफ्रिकन फलंदाजांची या सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या होती. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच षटकात चांगली सुरूवात केली, पण त्यानंतर त्यांना एकेका धावेसाठी झगडावं लागलं.

आफ्रिकेने पॉवरप्लेमदध्ये ३ विकेट्स गमावत अवघ्या २९ धावा केल्या होत्या. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ७ ते १० षटकांमध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी एकही विकेट गमावली नसली तरी अवघ्या ४ धावा केल्या. भारताकडून फिरकीपटूंनी ९ विकेट तर वेगवान गोलंदाजाने एकच विकेट घेतली आहे. पारूनिका सिसोदियाने ७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यानंतर आयुषी शुक्लाने ९ धावा देत २ विकेट्स, वैष्णवी शर्मा २३ धावा देत २ विकेट तर गोंगाडी त्रिशाने १५ धावा देत ३ विकेट्स नावे केल्या.

भारतीय संघाने २०२३ मध्ये पहिल्यांदा महिलांचा अंडर-१९ टी-२० विश्वचषक जिंकला होता. यंदा २०२५ मध्ये गतविजेता भारतीय संघ हे विजेतेपद आपल्याकडे कायम राखण्यासाठी उतरला होता. या संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना न गमावता अजिंक्य राहत स्पर्धेचे हे जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला होता. यानंतर यजमान मलेशियाचा १० गडी राखून पराभव केला. टीम इंडियाविरुद्ध श्रीलंकेचाही ६० धावांनी पराभव झाला. तर भारताची सलामीवीर त्रिशा गोंगाडीच्या शतकाच्या जोरावर भारताने स्कॉटलंडविरूद्ध १५० धावांनी मोठा विजय नोंदवला. तर उपांत्य फेरीत इंग्लंडचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला आणि आता ९ विकेट्सने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत जेतेपदावर दुसऱ्यांदा नाव कोरले.