न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी
भारतीय पुरुष हॉकी संघाने चोख प्रत्युत्तर देत न्यूझीलंडवर ३-१ असा विजय मिळवून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यातील चुकांवर अभ्यास करून भारताने बुधवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात विजय साजरा केला. अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याला या विजयाचे श्रेय जाते. त्याने दोन पेनल्टी कॉर्नर अडवून यजमानांना हतबल केले.
सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक पवित्रा अवलंबिला आणि १० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर कमावला, परंतु भारताने ही संधी गमावली. मात्र तीन मिनिटांनंतर भारताने रमणदीप सिंगच्या गोलवर १-० अशी आघाडी घेतली. बिरेंद्र लाक्राच्या क्रॉसवर रमणदीपने हा गोल केला. दुसऱ्या सत्रातही आक्रमक खेळ कायम राखत भारताने यजमानांवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धरमवीर सिंगने गोल करण्यासाठी केलेला प्रयत्न न्यूझीलंडच्या गोलरक्षकाने अडवला. प्रतिहल्ला करण्यासाठी उत्सुक असलेल्या न्यूझीलंडला भारताचा बचाव भेदण्यात अपयश येत होते. २३ व्या मिनिटाला न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. मध्यंतरानंतर गुरजिंदर सिंगने भारताची आघाडी वाढवण्याची संधी गमावली. न्यूझीलंडने प्रतिहल्ला करून ३५ व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नरची संधी कमावली; परंतु याही वेळेला श्रीजेशने त्यांना रोखले. ४५ व्या मिनिटाला केन रसलने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. चौथ्या आणि अखेरच्या सत्रात दोन्ही संघांकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले. ५२ व्या मिनिटाला भारताला त्याचे फळ मिळाले. मनप्रीत सिंगच्या अचूक पासला ललित उपाध्यायने गोलजाळीची दिशा दाखवून भारताला २-१ असे आघाडीवर आणले. त्यानंतर निक्कीन थिमैआहने तिसरा गोल करून भारताचा विजय निश्चित केला.