आशियाई फुटबॉल फेडरेशन चषक पात्रता फेरीच्या चुरशीच्या सामन्यात भारताने तैपेईवर २-१ने मात केली. बदली खेळाडू म्हणून आलेल्या रॉबिन सिंगने ९१व्या खेळेला गोल करत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने या सामन्यात चेंडूवर बहुतांशी वेळ नियंत्रण राखले. छोटे-छोटे पासेस हे भारताच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. तैपेईच्या सु डे काइला १३व्या मिनिटाला फ्री किकची संधी मिळाली. मात्र भारताचा गोलरक्षक पॉलने त्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. पहिल्या सत्रात भारताने पाच कॉर्नरची कमाई केली. मात्र त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला अपयश आले.  
ज्वेल राजाने कर्णधार सुनील छेत्रीकडून मिळालेल्या पासचा सुरेख उपयोग करून घेत ४०व्या मिनिटाला गोल केला. मात्र यानंतर तैपेईतर्फे ५४व्या मिनिटाला ली ताई लिनने गोल करत बरोबरी केली. यानंतर दोन्ही संघांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटला. अतिरिक्त वेळेत रॉबिनने मध्यरक्षक सय्यद रहीम नबीच्या क्रॉसवर गोल करत भारताला निसटता विजय मिळवून दिला.
भारताने या सामन्यात गोलरक्षक संदीप नंदी, डेन्झिल फ्रान्को आणि अल्विन जॉर्ज यांना विश्रांती दिली. सुब्रता पॉल, निर्मल चेत्री, गुरजिंदर कुमार आणि ज्वेल राजा यांनी संघात समाविष्ट करण्यात आले.

Story img Loader