भारतीय हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५-२ असा दणदणीत पराभव करून लॅन्को आंतरराष्ट्रीय सुपर सीरिज हॉकी स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.
नऊ जणांचा समावेश असलेल्या या हॉकी स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पहिल्या सत्रात भारताने तीन गोल केले, तर दुसऱ्या सत्रात दोन करण्याची किमया भारताने साधली. पाकिस्तानतर्फे दोन्ही सत्रांत प्रत्येकी एक गोल केले ते शाफकत रसूल आणि मुहम्मद रिझवान सीनियर यांनी. भारतातर्फे व्ही. आर. रघुनाथ (सातव्या मिनिटाला), एस. व्ही. सुनील (नवव्या आणि ३३व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (१५व्या मिनिटाला) आणि मनप्रीत सिंग (२९व्या मिनिटाला) यांनी गोल झळकावले.
या विजयामुळे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी पाकिस्ताविरुद्धच रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दरम्यान, यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने विजयी घोडदौड कायम राखली असून त्यांनी इंग्लंडवर ६-२ असा विजय मिळवला. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत विजयासाठी ऑस्ट्रेलियाला दावेदार समजले जाते. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनी याआधीच अंतिम फेरी गाठली होती.

Story img Loader