हार्दिक पंड्याचे (तीन बळी आणि नाबाद ३३ धावा) अष्टपैलू योगदान, भुवनेश्वर कुमारचा (४/२६) भेदक मारा आणि रवींद्र जडेजाच्या (३५ धावा) अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून सरशी साधत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा विजयारंभ केला. या विजयामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या हार्दिक पंड्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीही पंड्याच्या या खेळीच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. आफ्रिदीने ट्विटरवरुन यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. तर आफ्रिदीचा एकेकाळचा संघ सहकारी शोएब अख्तरनेही पाकिस्तानच्या संघाचं कौतुक केलं आहे.
नक्की पाहा >> India Vs Pakistan: विजयानंतर जय शाहांनी तिरंगा पकडण्यास दिला नकार! मैदानातील Video Viral; विरोधक म्हणतात, “जर ही गोष्ट…”
दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर पाकिस्तानचा डाव १९.५ षटकांत १४७ धावांत आटोपला. भुवनेश्वरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (१०) झटपट माघारी पाठवले. तसेच फखर झमान (१०) आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद रिझवान (४२ चेंडूंत ४३) आणि इफ्तिकार (२२ चेंडूंत २८) यांनी ४५ धावांची भागीदारी रचली. मात्र, हार्दिकने या दोघांसह खुशदिल शाहला (२) दोन षटकांच्या अंतराने बाद केले, तर भुवनेश्वरने शादाब खान (१०), आसिफ अली (९) आणि नसीम शाह (०) यांना माघारी धाडले. परंतु, शाहनवाज दहानी (६ चेंडूंत नाबाद १६) आणि हॅरिस रौफ (७ चेंडूंत नाबाद १३) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानला दीडशे धावांनजीक पोहोचता आले.
नक्की वाचा >> India Beat Pakistan By 5 Wickets: सामना जिंकल्या जिंकल्या PM मोदींची पोस्ट; म्हणाले, “आजच्या सामन्यात भारतीय संघाने…”
पाकिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले. नसीम शाहने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा सलामीवीर केएल राहुलचा त्रिफळा उडवला. यानंतर विराट कोहली (३४ चेंडूंत ३५) आणि कर्णधार रोहित शर्मा (१८ चेंडूंत १२) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ४९ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने कोहली आणि रोहित या दोघांनाही इफ्तिकार अहमदकरवी झेलबाद केले. सूर्यकुमार यादवही (१८) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. परंतु जडेजा (२९ चेंडूंत ३५ धावा) आणि हार्दिक (१७ चेंडूंत नाबाद ३३) यांनी ५२ धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.
नक्की वाचा >> IND vs PAK Asia Cup: जय शाहांमुळे संजय मांजरेकर ट्रोल; मांजरेकरांची ‘ही’ दोन विधानं ठरली कारण; अनेकांनी व्यक्त केली नाराजी
आफ्रिदी काय म्हणाला?
सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाला चांगला खेळ करण्याचा आणि परिणामांचा विचार न करण्याचा सल्ला देणाऱ्या शाहीद आफ्रिदीने सामन्यानंतर मध्यरात्री एक ट्वीट केलं आहे. “जेव्हा दोन बलाढ्य संघ एका मोठ्या सामन्यात खेळतात आणि तो सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जातो तेव्हा चाहतेही हा सामना जिंकतात. असे पाहण्यासारखे सामने म्हणजे चाहत्यांचा विजयच असतो,” असं आफ्रिदीने म्हटलं आहे. तसेच पुढे त्याने हार्दिक पंड्याचं कौतुकही केलं आहे. “हार्दिक पंड्याने दोन्ही डावांमध्ये आपली उपस्थिती दाखवून दिली. पाकिस्तानच्या नासीम आणि नवाझने आपले कौशल्य दाखवले,” असं शाहीद आफ्रिदीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
नक्की पाहा >> India Beat Pakistan: हार्दिक पंड्याने विजयी षटकार लगावताच शरद पवारांनी…; सेलिब्रेशनचा खास Video सुप्रिया सुळेंनी केला शेअर
शोएब अख्तर काय म्हणाला?
रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून लोकप्रिय असणाऱ्या शोएब अख्तरने ट्विटरवरुन या सामन्यानंतर सामाना रंजक स्थितीमध्ये घेऊन गेल्याबद्दल आणि संघर्षपूर्ण लढत दिल्याबद्दल पाकिस्तानी संघाचं कौतुक केलं आहे. “पाकिस्तानच्या गोलंदांनी चांगलं पुरागमन केलं. मात्र सामन्याच्या शेवटी भारत अधिक शक्तीशाली ठरला. छान सामना झाला,” असं शोएबने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> IND vs PAK T20 Asia Cup: …म्हणून ऋषभ पंत भारत-पाक सामन्यातून बाहेर; मैदानातील ‘या’ अभिनेत्रीला ठरवलं जातंय दोषी
भारताचा पुढील सामना हा हाँगकाँगच्या संघाशी होणार आहे. बुधवारी रात्री साडेसात वाजता हा सामना होणार आहे.