राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघानं ‘रुपेरी’ कामगिरी केली आहे. बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला मलेशियाकडून ३-१ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय बॅडमिंटन संघाचं सलग दुसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. भारताला ‘रौप्य’ पदकावर समाधान मानावं लागलं. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं हे १३ वे पदक आहे. याआधी भारतीय बॅडमिंटन संघानं २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.

मलेशियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला तेंग फोंग एरॉन चिया आणि वूई यिक सोह या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात मलेशियानं पुरुष दुहेरीत भारताचा २१-१८ आणि २१-१५ ने पराभव केला. त्यामुळे मलेशिया संघानं १-० ने आघाडी घेतली.

हेही वाचा- IND vs WI 3rd T20 : भारताची मालिकेत पुन्हा मुसंडी; विंडीजचा सात गडी राखून पराभव

यानंतर दुसऱ्या सामन्यात पीव्ही सिंधूनं मलेशियाच्या जिन वेई गोहचा पराभव करत १-१ अशी बरोबरी साधली. अत्यंत चुरशीच्या सामन्यात सिंधूने लेशियाच्या जिन वेई गोहचा २२-२० आणि २१-१७ ने पराभव केला. त्यानंतर पुरुष एकेरीचा तिसरा सामना भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि योंग यांच्यात पार पडला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात किदम्बीला १९-२१, २१-६, १६-२१ च्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मलेशियानं पुन्हा २-१ ने आघाडी घेतली.

हेही वाचा- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : लॉन बॉल्स : महिला संघाला सुवर्णपदक

भारताची बॅडमिंटनपटू त्रिषा जॉली आणि गायत्री गोपिचंद या जोडीचा मुरलीधरन थिनाह आणि कूंक ली पियर्ली तान यांच्यात महिला दुहेरीचा चौथा आणि अखेरचा सामना पार पडला. यामध्ये मलेशियानं भारताचा १८-२१ आणि १७-२१ अशा फरकानं पराभव केला. यामुळे भारतानं मिश्र सांघिक स्पर्धेचा सामना ३-१ ने गमावला. भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.