–  भारताचा १०८ धावांनी विजय
–   मालिकेत १-० अशी आघाडी
–  द. आफ्रिकेचा १०९ धावांत खुर्दा
–  रवींद्र जडेजासामनावीर
आयएस बिंद्रा स्टेडियमची खेळपट्टी सामन्याच्या तिन्ही दिवशी कच्च्या रस्त्यासारखीच भासली. क्रिकेटच्या भाषेत हा आखाडाच होता. या आखाडय़ावर पहिल्या दिवसापासूनच माती उकरली होती, फलंदाज चाचपडत होते. प्रत्येक चेंडूगणिक उडणारी माती आणि कधी हातभर वळणारे, खाली बसणारे, अचानक उसळी घेणारे चेंडू फलंदाजांसाठी अनाकलनीय होते. याच परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत भारताने तीन दिवसांतच पहिला आखाडा जिंकला. भारतीय फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. दुसऱ्या डावात भारताने फिरकीच्या जाळ्यात ओढत १०९ धावांमध्ये त्यांचा खुर्दा उडवला. पहिला कसोटी सामना भारताने १०८ धावांनी जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात पाच बळींसह एकूण आठ बळी मिळवणारा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या खेळपट्टीने संपूर्ण सामन्यात फलंदाजांचे तीनतेरा वाजवले. प्रत्येक फलंदाज चाचपडत खेळत होता. फिरकीपटूंना मात्र ही खेळपट्टी कुरण होती. भारतानेच दोन्ही डावांत दोनशे धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने जेव्हा आफ्रिकेपुढे २१८ धावांचे आव्हान ठेवले, तेव्हाच भारतीय संघ हा सामना जिंकेल, हे स्पष्ट होते. दुसऱ्या डावात जडेजाने भेदक मारा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावात पाच बळी मिळवणाऱ्या रवीचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात तीन बळी मिळवत त्याला सुयोग्य साथ दिली.
ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर भारताने कसोटी मालिकेत विजयाचे खाते उघडले. तर विराट कोहलीने मायदेशातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. जडेजाला पहिल्याच षटकापासून चांगला सूर गवसला. आफ्रिकेने नव्या रणनीतीनुसार सलामीला पाठवलेल्या व्हरनॉन फिलँडरला (१) त्याने पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतरच्या षटकात त्याने कर्णधार हशिम अमलाचा उद्ध्वस्त केलेला त्रिफळा नजरेचे पारणे फेडणारा होता. मधल्या यष्टीवर पडलेला चेंडू बाहेर जाईल, असा अंदाज घेत अमलाने तो चेंडू सोडला. पण चेंडू न वळता थेट मधल्या यष्टीवर जाऊन आदळला आणि अमला ‘क्लीन बोल्ड’ झाला. अमलासारखा मोठा अडसर भोपळाही न फोडता बाद झाल्याने भारतीयांचा आत्मविश्वास उंचावलेला होता. फक्त आता एबी डी’व्हिलियर्सला रोखण्याचे डावपेच कोहली आखत होता. त्याने पहिल्या डावात डी’व्हिलियर्सला बाद करणाऱ्या अमित मिश्राच्या हाती चेंडू सुपूर्द केला. त्यानेही पहिल्या डावाप्रमाणेच डी’व्हिलियर्सला त्रिफळाचीत करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. पहिल्या डावात सलामीला आलेला स्टॅनिअन व्हॅन झीलने (३६) दुसऱ्या डावात मधल्या फळीत फलंदाजीला येऊन झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने रहाणेकरवी त्याला बाद करत विजयाच्या मार्गातील अडथळा दूर केला. व्हॅन झीलने सायमन हार्मरच्या साथीने सातव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. व्हॅन झील बाद झाल्यावर सात धावांमध्येच भारताने दोन बळी मिळवले आणि पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, भारताची फलंदाजीही दक्षिण आफ्रिकेसारखीच ढासळली. या खेळपट्टीचा विचार करता दुसऱ्या दिवशी २ बाद १२५ अशी भारताची चांगली सुरुवात होती. पण शनिवारी भारताला ७५ धावांमध्ये आठ फलंदाज गमवावे लागले. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या दिवशीच ६३ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी त्यामध्ये त्याला फक्त १४ धावांची भर घालता आली. पुजाराने ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने एकूण ७७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हार्मर आणि इम्रान ताहिर यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी चार बळी मिळवले.

खेळपट्टीत धोकादायक असे काहीच नव्हते. चेंडू मोठय़ा प्रमाणावर वळत नव्हता. फलंदाजांनी आपल्या तंत्रात योग्य बदल केले तरच या खेळपट्टीवर धावा होऊ शकतात. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळी करत हेच दाखवून दिले. रवींद्र जडेजाने केलेले पुनरागमन संस्मरणीय आहे. कसोटी कर्णधार म्हणून भारतात झालेल्या पहिल्याच कसोटीत विजय मिळवणे समाधान देणारे आहे. जबरदस्त सांघिक प्रदर्शनामुळेच दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढय़ संघाला नमवू शकलो.
– विराट कोहली, भारताचा कर्णधार

राजकोटच्या फिरकीला पोषक खेळपट्टीवर मी यापूर्वी खेळलो असल्याने या सामन्यात माझा आत्मविश्वास उंचावला होता. मला स्वत:ला या सामन्यात पुन्हा सिद्ध करायला मिळाले. पुनरागमनाच्या सामन्यात माझ्याकडून चांगली कामगिरी झाली. त्यासाठी मी अथक सराव केला होता.
रवींद्र जडेजा, भारताचा अष्टपैलू खेळाडू

विजयाचे श्रेय भारताला द्यायलाच हवे. त्यांनी दोन्ही डावांत दोनशे धावा केल्या आणि त्यांच्या फिरकीपटूंनी भेदक मारा केला. १५०-१६० धावांचे आव्हान असले असते तर ते पूर्ण करता आले असते. या सामन्यात अखेरच्या सत्रापर्यंत आम्ही लढा दिला, पण त्यामध्ये यशस्वी होऊ शकलो नाही.
– हशिम अमला, द. आफ्रिकेचा कर्णधार

 

धावफलक
भारत (पहिला डाव) : २०१
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : १८४
भारत (दुसरा डाव) : शिखर धवन झे. डी’व्हिलियर्स गो. फिलँडर ०, मुरली विजय झे. बदली खेळाडू (बावूमा) गो. ताहीर ४७, चेतेश्वर पुजारा झे. अमला गो. ताहिर ७७, विराट कोहली झे. व्हिलास गो. व्हॅन झील २९, अजिंक्य रहाणे झे. बदली खेळाडू (बावूमा) गो. हार्मर २, वृद्धिमान साहा झे, व्हिलास गो. ताहिर २०, रवींद्र जडेजा पायचीत गो. हार्मर ८, अमित मिश्रा झे. डय़ू प्लेसिस गो. हार्मर २, रवीचंद्रन अश्विन झे. अमला गो. ताहिर ३, उमेश यादव त्रि. गो. हार्मर १, वरुण आरोन नाबाद १, अवांतर (बाइज ९, लेग बाइज १) १०, एकूण ७५.३ षटकांत सर्व बाद २००.
बाद क्रम : १-९, २-९५, ३-१६१, ४-१६४, ५-१६४, ६-१७८, ७-१८२, ८-१८५, ९-१८८, १०-२००.
गोलंदाजी : व्हरनॉन फिलँडर १२-३-२३-१, सिमोन हार्मर २४-५-६१-४, डीन एल्गर ७-१-३४-०, इम्रान ताहीर १६.३-१-४८-४, कागिसो रबाडा १२-७-१९-०, स्टॅनिअन व्हॅन झील ४-१-५-१.
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : डीन एल्गार झे. कोहली गो. आरोन १६, व्हरनॉन फिलँडर पायचीत गो. जडेजा १, फॅफ डय़ू प्लेसिस झे. रहाणे गो. अश्विन १, हशिम अमला त्रि. गो. जडेजा ०, एबी डी’व्हिलियर्स त्रि. गो. मिश्रा १६, स्टॅनिअन व्हॅन झील झे. रहाणे गो. अश्विन ३६, डीन व्हिलास त्रि. गो. जडेजा ७, सायमन हार्मर झे. रहाणे गो. जडेजा ११, डेल स्टेन झे. विजय गो. अश्विन २, कागिसो रबाडा नाबाद १, इम्रान ताहिर पायचीत गो. जडेजा ४, अवांतर (बाइज ८, लेग बाइज ५, वाइड १) १४, एकूण ३९.५ षटकांत सर्व बाद १०९.
बाद क्रम : १-८, २-९, ३-१०, ४-३२, ५-४५, ६-६०, ७-१०२, ८-१०२, ९-१०५, १०-१०९.
गोलंदाजी : रवीचंद्रन अश्विन १४-५-३९-३, रवींद्र जडेजा ११.५-४-२१-५, अमित मिश्रा ८-०-२६-१, वरुण आरोन ३-०-३-१, उमेश यादव ३-०-७-०.
निकाल : भारत १०८ धावांनी विजयी. सामनावीर : रवींद्र जडेजा.

Story img Loader