– भारताचा १०८ धावांनी विजय
– मालिकेत १-० अशी आघाडी
– द. आफ्रिकेचा १०९ धावांत खुर्दा
– रवींद्र जडेजासामनावीर
आयएस बिंद्रा स्टेडियमची खेळपट्टी सामन्याच्या तिन्ही दिवशी कच्च्या रस्त्यासारखीच भासली. क्रिकेटच्या भाषेत हा आखाडाच होता. या आखाडय़ावर पहिल्या दिवसापासूनच माती उकरली होती, फलंदाज चाचपडत होते. प्रत्येक चेंडूगणिक उडणारी माती आणि कधी हातभर वळणारे, खाली बसणारे, अचानक उसळी घेणारे चेंडू फलंदाजांसाठी अनाकलनीय होते. याच परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत भारताने तीन दिवसांतच पहिला आखाडा जिंकला. भारतीय फिरकीपटूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. दुसऱ्या डावात भारताने फिरकीच्या जाळ्यात ओढत १०९ धावांमध्ये त्यांचा खुर्दा उडवला. पहिला कसोटी सामना भारताने १०८ धावांनी जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात पाच बळींसह एकूण आठ बळी मिळवणारा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या खेळपट्टीने संपूर्ण सामन्यात फलंदाजांचे तीनतेरा वाजवले. प्रत्येक फलंदाज चाचपडत खेळत होता. फिरकीपटूंना मात्र ही खेळपट्टी कुरण होती. भारतानेच दोन्ही डावांत दोनशे धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने जेव्हा आफ्रिकेपुढे २१८ धावांचे आव्हान ठेवले, तेव्हाच भारतीय संघ हा सामना जिंकेल, हे स्पष्ट होते. दुसऱ्या डावात जडेजाने भेदक मारा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावात पाच बळी मिळवणाऱ्या रवीचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात तीन बळी मिळवत त्याला सुयोग्य साथ दिली.
ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर भारताने कसोटी मालिकेत विजयाचे खाते उघडले. तर विराट कोहलीने मायदेशातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. जडेजाला पहिल्याच षटकापासून चांगला सूर गवसला. आफ्रिकेने नव्या रणनीतीनुसार सलामीला पाठवलेल्या व्हरनॉन फिलँडरला (१) त्याने पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतरच्या षटकात त्याने कर्णधार हशिम अमलाचा उद्ध्वस्त केलेला त्रिफळा नजरेचे पारणे फेडणारा होता. मधल्या यष्टीवर पडलेला चेंडू बाहेर जाईल, असा अंदाज घेत अमलाने तो चेंडू सोडला. पण चेंडू न वळता थेट मधल्या यष्टीवर जाऊन आदळला आणि अमला ‘क्लीन बोल्ड’ झाला. अमलासारखा मोठा अडसर भोपळाही न फोडता बाद झाल्याने भारतीयांचा आत्मविश्वास उंचावलेला होता. फक्त आता एबी डी’व्हिलियर्सला रोखण्याचे डावपेच कोहली आखत होता. त्याने पहिल्या डावात डी’व्हिलियर्सला बाद करणाऱ्या अमित मिश्राच्या हाती चेंडू सुपूर्द केला. त्यानेही पहिल्या डावाप्रमाणेच डी’व्हिलियर्सला त्रिफळाचीत करत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. पहिल्या डावात सलामीला आलेला स्टॅनिअन व्हॅन झीलने (३६) दुसऱ्या डावात मधल्या फळीत फलंदाजीला येऊन झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने रहाणेकरवी त्याला बाद करत विजयाच्या मार्गातील अडथळा दूर केला. व्हॅन झीलने सायमन हार्मरच्या साथीने सातव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. व्हॅन झील बाद झाल्यावर सात धावांमध्येच भारताने दोन बळी मिळवले आणि पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, भारताची फलंदाजीही दक्षिण आफ्रिकेसारखीच ढासळली. या खेळपट्टीचा विचार करता दुसऱ्या दिवशी २ बाद १२५ अशी भारताची चांगली सुरुवात होती. पण शनिवारी भारताला ७५ धावांमध्ये आठ फलंदाज गमवावे लागले. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या दिवशीच ६३ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी त्यामध्ये त्याला फक्त १४ धावांची भर घालता आली. पुजाराने ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने एकूण ७७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हार्मर आणि इम्रान ताहिर यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी चार बळी मिळवले.
आखाडा जिंकला!
आयएस बिंद्रा स्टेडियमची खेळपट्टी सामन्याच्या तिन्ही दिवशी कच्च्या रस्त्यासारखीच भासली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-11-2015 at 02:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India won test match