ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱया कसोटीत भारताने सोमवारी सहा गडी राखून विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली. चार कसोटींच्या मालिकेमध्ये भारत ३-०ने विजयी आघाडीवर आहे. भारतीय गोलंदाजांचे अचूक टप्प्यावरील चेंडू खेळण्यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सुरुवातीपासून निरुपयोगी ठरले आणि भारताच्या विजयाचा मार्ग सोमवारी सुकर झाला. दुसऱया डावामध्ये ऑस्ट्रेलियाने ठेवलेले १३३ धावांचे लक्ष्य भारतीय फलंदाजांनी चार गड्यांच्या मोबदल्यात गाठले. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विजय़ी चौकार मारून टीम इंडियाच्या सलग तिसऱया कसोटी विजयाची हॅटट्रिक साधली.
भारताच्या दुसऱया डावामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ३४ धावा काढल्या. पहिल्या डावात १८७ धावा काढणाऱया शिखर धवनला दुखापत झाल्याने त्याला दुसऱया डावात सलामीला पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताच्या दुसऱया डावाची सुरुवात केली. पण ते दोघेही फार काळ मैदानावर टिकले नाहीत. पुजारा २८ धावांवर तर मुरली विजय २६ धावांवर बाद झाला. विराट कोहलीला सिडलने ३४ धावांवर बाद केले. सचिन तेंडुलकर गडबडीत धाव काढण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. धोनी १८, तर रविंद्र जडेजा ८ धावा काढून नाबाद राहिले.
सोमवारी दुपारी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २२३ धावांवर आटोपला. भारतापुढे या सामन्यातील विजयाबरोबरच मालिका विजयासाठी १३३ धावांचे आव्हान होते.
सोमवारी सकाळी नॅथन लिऑनला प्रग्यान ओझाने पहिल्यांदा बाद केले. रविवारच्या ७५ धावांवरून ऑस्ट्रेलियाचा संघ ८९ वर पोहोचला असताना, लिऑन बाद झाला. त्यानंतर मायकल क्लार्कला रविंद्र जडेजाने टिपले. क्लार्कने टोलविलेला चेंडू चेतेश्वर पुजाराने अचूकपणे झेलला आणि क्लार्क १८ धावांवर बाद झाला. फिलीप ह्युजेसला अश्विनने ६९ धावांवर पायचीत बाद केले. तो गेल्यावर लगेचच मोझेस हेनरिक्सही बाद झाला. पुन्हा जडेजाने त्याला बाद केले. ओझाने अप्रतिम चेंडू टाकून पिटर सिडलला अवघ्या १३ धावांवर तंबूत धाडले. भोजनानंतर ब्रॅड हॅडिन बाद झाला. अश्विनने त्याला ३० धावांवर पायचीत बाद केले. त्यानंतर मैदानावरील शेवटच्या जोडीतील मिचेल स्टार्कला जडेजाने ३५ धावांवर बाद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा