India vs New Zealand 3rd ODI Match Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने ९० धावांनी जिंकत मालिकेत ३-०ने निर्भेळ यश संपादन केले. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी झळकावलेल्या वेगवान शतकांच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ९ बाद ३८५ धावा धावफलकावर लावल्या. तीन गडी बाद करत ब्रेक थ्रू मिळवून देणाऱ्या शार्दूल ठाकूरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शुबमनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
टीम इंडियाने ठेवलेल्या डोंगराएवढ्या ३८६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. शून्य धावांवर असताना हार्दिक पांड्याने फिन अॅलनला बाद केले मात्र त्याचा साथीदार डेव्हॉन कॉनवेने भारतीय गोलंदाजांना चौकार-षटकार मारत त्याने अक्षरशः चोपून काढले. त्याचे एवढे धाडस झाले कारण टीम इंडियाचा यष्टीरक्षक इशान किशनने त्याच्या स्टंपिंगची चालून आलेली संधी गमावली. त्यावेळी तो ४७ चेंडूत ५७ धावांवर खेळत होता. किशनच्या एका चुकीमुळे टीम इंडिया इंदोरच्या सामन्यात संकटात सापडली होती. अखेर तो १३८ धावा करून तो बाद झाला, अन्यथा भारताला सामना जिंकणे अवघड होते तरीदेखील तब्बल ८१ धावांचा फटका भारताला बसला. अखेर न्यूझीलंडचा डाव २९५ धावांवर आटोपला. आणि भारताने तब्बल ९० धावांनी विजय मिळवला.
हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी डेव्हॉन कॉनवेला साथ देत धावांचा पाठलाग करण्यास मदत केली. त्यांनी अनुक्रमे ४२, २४ आणि २६ धावा केल्या. कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांना मात्र दोन आकडी धावसंख्या देखील गाठला आली नाही. अखेरपर्यत टिकून राहिलेला मिचेल सँटनर ३४ धावांवर बाद झाला. तळाच्या फलंदाजांनी त्याला साथ दिली नाही. डॅरिल मिशेल आणि डेव्हॉन कॉनवे यांची अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर भारताला ब्रेक थ्रू मिळवणे आवश्यक होते अशातच मराठमोळ्या शार्दूल ठाकूरने ४५ धावांत ३ गडी बाद करत टीम इंडियाची गाडी पुन्हा रूळावर आणली. त्याला कुलदीप यादवने ३ गडी बाद करत साथ दिली. उमरान मलिकने १ आणि चहलने २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया मालिकेत २-० ने पुढे होता. तिसरा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याकडे त्याची नजर होती ती पूर्ण करत आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेत बादशाह असल्याचे सिद्ध केले. ११४ अंकासह क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि शुबमन मध्ये २१२ धावांची सलामी भागीदारी झाली. रोहित शर्माने ८३ चेंडूत शतक साजरे केले. त्याच्या या शतकी खेळीला ९ चौकार आणि ६ षटकारांचा साज होता. हे त्याचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले असून १९ जानेवारी २०२० नंतर रोहितने शतक झळकावले आहे. हे ३०वे शतक ठरले ज्यापद्धतीने हे दोन्ही खेळतात आहे त्यानुसार कदाचित रोहित शर्मा आपले चौथे द्विशतक मारू शकत होता मात्र तो १०१ धावांवर बाद झाला. तर शुबमन गिलने ७२ चेंडूत शतक साजरे केले. गिलच्या या खेळीत १३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. त्याने द्विशतकपासून जी सुरुवात केली होती ती अशीच पुढे ठेवली आहे. सलग ४ डावातील शुबमनचे तिसरे शतक ठरले असून ११२ धावा करून तो बाद झाला.
या दोघांव्यतिरिक्त इतर कोणाला मोठी धावसंख्या करता आली नाही. कोहली ३६, इशान १७, सुर्यकुमार १४ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावा करून बाद झाले. अखेरच्या काही षटकात हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताला ३८५ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. हार्दिकने ३८ चेंडूत ५४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर ब्रेसवेलला एक गडी बाद करण्यात यश मिळाले. मात्र एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यात न्यूझीलंडला अपयश आले.