भारतीय संघाचा डावखुरा फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण राजकोट येथील जाडेजाच्या हॉटेलमध्ये नगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना बुरशीजन्य अन्न आढळून आले आहे. राजकोट नगरपालिकेच्या, आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी रविंद्र जाडेजाच्या ‘Jaddu’s Food Field’ या हॉटेलवर छापा टाकला. त्याच चौकशीत हा सगळा प्रकार समोर आला.

रविंद्र जाडेजाच्या हॉटेलमध्ये तब्बल २१२ किलो अन्न हे खाण्यायोग्य नव्हतं. काही उत्पादनांच्या वापराची मुदत उलटून गेली होती, तर काही बेकरीजन्य पदार्थांना बुरशी लागलेली आढळून आली. याचसोबत शीतगृहात ठेवण्यात आलेल्या भाज्याही खराब झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले. रविंद्र जाडेजासोबत परिसरातील आणखी दोन हॉटेलवर स्थानिक नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने छापे घातल्याचे समजते आहे. ‘अहमदाबाद मिरर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार याप्ररणी रविंद्र जाडेजाच्या हॉटेलला नोटीस बजावलेली आहे.

याप्रकरणी रविंद्र जाडेजाच्या बहिणीने ‘हिंदुस्थान टाईम्स’ या वृत्तपत्राकडे आपली बाजू मांडली आहे. “गरजेनुसार आम्ही काही अन्नपदार्थ हे उकळवून तर काही पदार्थ हे शिजवून ठेवतो. मात्र संपूर्ण खाद्यपदार्थांना बुरशी लागलेली नसून, काही खाद्यपदार्थांना बुरशी लागलेली आहे. मात्र यापुढे असा प्रकार पुन्हा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.” त्यामुळे रविंद्र जाडेजाच्या बहिणीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी या प्रकरणी जाडेजाच्या हॉटेलवर काय कारवाई करतात हे पहावं लागणार आहे.