पीटीआय, पॅरिस

भारताच्या पुरुष आणि महिला रीकर्व्ह तिरंदाजी संघांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मानांकन फेरीतील दमदार कामगिरीसह थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. पुरुष विभागात धीरज बोम्मादेवरा (चौथ्या स्थानी), तर महिलांत अंकित भकट (११व्या स्थानी) या ऑलिम्पिक पदार्पणवीरांनी मानांकन फेरीत चमकदार कामगिरी केली.

महिलांमध्ये अंकिताने ७२० पैकी ६६६ गुणांचा वेध घेत मानांकन फेरीत ११वे स्थान मिळवले. भजन कौर ५५९ गुणांसह २२व्या, तर दीपिका कुमारी ६५८ गुणांसह २३व्या स्थानी राहिली. या तिघींच्या एकत्रित १९८३ गुणांसह भारताने सांघिक विभागात चौथे स्थान मिळवले. दक्षिण कोरियाने २०४६ गुणांसह अग्रस्थान पटकावले. चीन आणि मेक्सिको या संघांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. अव्वल चारही संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. मानांकन फेरीत पाचव्या ते १२व्या स्थानी राहिलेल्या संघांना उप-उपांत्यपूर्व फेरीत खेळावे लागेल. भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्स आणि नेदरलँड्स यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध खेळेल. हा अडथळा पार करण्यात यश आल्यास उपांत्य फेरीत भारताला कोरियाविरुद्ध खेळावे लागू शकेल. वैयक्तिक विभागात मानांकन फेरीतून एकूण ६४ तिरंदाजांनी आगेकूच केली आहे.

हेही वाचा >>>Jaspreet Bumrah: जसप्रीत बुमराहशी खास संवाद एक्स्प्रेस अड्डावर, पाहा लाईव्ह

पुरुषांमध्ये धीरजने उत्कृष्ट कामगिरी करताना ६८१ गुणांसह मानांकन फेरीत चौथे स्थान पटकावले. अनुभवी तरुणदीप रायने ६७४ गुणांसह १४वे, तर महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवने ६५८ गुणांसह ३९वे स्थान मिळवले. या तिघांनी वैयक्तिक आणि सांघिक फेरीत आगेकूच केली. या तिघांनी मिळून एकत्रित २०१३ गुणांचा वेध घेतल्याने त्यांना सांघिक विभागात तिसरे स्थान मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच त्यांना उपांत्य फेरीत कोरियाविरुद्ध खेळावे लागणार नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे भारतीय पुरुष संघाला अंतिम फेरी गाठून पदक पटकावण्याची उत्तम संधी आहे.

तसेच वैयक्तिक विभागातील सर्वोत्तम कामगिरीमुळे अंकिता आणि धीरज यांना मिश्र सांघिक गटात एकत्रित खेळता येणार आहे. त्यामुळे या दोघांना तीन पदकांची संधी आहे.