ऑलिम्पिक व जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये पदक मिळवण्यासाठी सर्वोत्तम इच्छाशक्ती आवश्यक असते. मात्र पदक जिंकण्याची इच्छाच नसेल तर भरपूर सुविधा पायाशी लोळण घेत असताना आपले धावपटू रिकाम्या हातानेच मायदेशी परत येतात. लंडन येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय धावपटूंबाबत हाच अनुभव प्रत्ययाला आला.
साधारणपणे २०-२५ वर्षांपूर्वी अॅथलेटिक्स खेळात सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना फारशा सुविधा व सवलती मिळत नव्हत्या. अर्थार्जनाची हमी नव्हती. अशा परिस्थितीत तुटपुंज्या पगाराची नोकरी सांभाळतच आपले खेळाडू अॅथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवत असत. नोकरीच्या ठिकाणी पूर्णवेळ काम करूनच अनेक खेळाडू त्यानंतर स्पर्धेसाठी सराव करीत असत. साहजिकच ऑलिम्पिक किंवा जागतिक स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सरावाबाबत ते अपेक्षेइतके लक्ष देऊ शकत नव्हते. तरीही त्यांनी या दोन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये पदक मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला. दुर्दैवाने मिल्खा सिंग, गीता झुत्शी, श्रीराम सिंग, पी. टी. उषा यांची पदकाची संधी थोडक्यात हुकली. त्या तुलनेत गेल्या १५ वर्षांमध्ये भारतीय धावपटूंना भरपूर सुविधा व सवलती मिळू लागल्या आहेत. विविध अंतराच्या शर्यती, विविध फेकीचे प्रकार, विविध प्रकारच्या उडय़ांकरिता स्वतंत्र परदेशी प्रशिक्षक, शारीरिक तंदुरुस्ती तज्ज्ञ, मसाजिस्ट, आहारतज्ज्ञ, पूरक व्यायामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यायामशाळा, आदी सुविधा हल्लीच्या धावपटूंना मिळत आहेत. रेल्वे, सेनादल, एअर इंडिया, पेट्रोलियम कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही या धावपटूंना मिळत आहेत. एवढेच नव्हे तर या खेळाडूंना सरावासाठी विशेष सवलतही मिळत असते. एवढे असूनही या खेळाडूंना ऑलिम्पिक व जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये पदक मिळवता येत नाही.
जमैका, केनिया, टांझानिया, युगांडा, इथिओपिया, आदी अनेक छोटय़ा-छोटय़ा देशांचे खेळाडू पदकांचा खजिनाच लुटत असतात. मात्र त्या खेळाडूंच्या कामगिरीच्या जवळपासही आपल्या खेळाडूंची कामगिरी होत नाही. लंडन येथील जागतिक स्पर्धेतही आपल्या खेळाडूंना स्वत:च्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. आपल्या देशात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या निमंत्रित स्पर्धामध्ये पदक मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंना जागतिक स्पर्धेत पहिल्या २० खेळाडूंमध्येही स्थान मिळवता आले नाही. भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीलम शेरॉनला ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जागतिक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट केल्यानंतर भारतीय खेळाडूंबाबत खूप गवगवा झाला होता. मात्र आशियाई स्पर्धेत चीन, दक्षिण कोरिया, इराण, जपान आदी देशांचे अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी झाले नव्हते. बऱ्याच वेळा परदेशातील अव्वल खेळाडू अशा स्पर्धाकडे पाठच फिरवत असतात.
परदेशी खेळाडूंची देहबोली किंवा त्यांची वृत्ती सतत सर्वोत्तम यश मिळवण्यासाठीच बनलेली असते. आपले खेळाडू मात्र कूपमंडूक वृत्तीचेच असतात. जागतिक स्पर्धेत गोविंदन लक्ष्मणन हा पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी झाला होता. त्याचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. आपण राष्ट्रीय विक्रम करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत सहभागी झालो होतो, असे त्याने या शर्यतीनंतर सांगितले. वास्तविक जागतिक स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर ध्येय मोठे ठेवायचे की हलक्या कामगिरीवर समाधान मानायचे, हेदेखील या खेळाडूंना कळत नाही, यासारखे दुर्दैव नाही.
जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी प्रत्यक्ष लंडन येथे अव्वल दर्जाच्या प्रशिक्षणाची सुविधा मिळावी, यादृष्टीने काही शर्यतींकरिता परदेशी प्रशिक्षकांना पाचारण केले जाणार होते. मात्र ऐन वेळी हे प्रशिक्षक उपलब्ध झाले नाहीत. खरे तर या गोष्टींचे दीर्घकालीन नियोजन करण्याची आवश्यकता आहे. जागतिक स्पर्धाचा कालावधी अनेक महिन्यांपूर्वीच निश्चित झाला असतो. ऐन वेळी परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याऐवजी वर्षभर अगोदरच त्यांची नियुक्ती झाली तर खऱ्या अर्थाने त्यांचा लाभ खेळाडूंना होऊ शकतो.
आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूंना आपोआपच जागतिक स्पर्धेमधील स्थान निश्चित होते. मात्र सुधा सिंग व पी. यू्. चित्रा यांना त्यांची कामगिरी जागतिक स्पर्धेच्या पात्रतेइतकी झाली नाही, असे कारण देत त्यांना या प्रतिष्ठेच्या स्पर्धेपासून वंचित ठेवण्यात आले. जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहता त्यामधील अनेकांनी केवळ हजेरी लावण्याचेच काम केले. सुधा व चित्रा यांना संधी दिली असती तर त्यांच्या कारकीर्दीत जागतिक स्पर्धेचा समावेश झाला असता आणि त्यांना वगळल्यानंतर जे काही कलुषित वातावरण निर्माण झाले ते टाळता आले असते. भविष्यात तरी असे प्रसंग अॅथलेटिक्स संघटकांनी टाळले पाहिजेत. त्याचप्रमाणे जागतिक स्पर्धा म्हणजे आशियाई किंवा राष्ट्रकुल स्पर्धा नाही, हे उमजून त्याकरिता दीर्घकालीन नियोजन व त्याची अंमलबजावणी पाहिजे. अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे ‘नेमेची येतो अपयशाचा पावसाळा’ हेच पुन्हा भारतीय धावपटूंबाबत दिसून येईल.
मिलिंद ढमढेरे
milind.dhamdhere@expressindia.com