क्रिकेट हाच धर्म असलेल्या आपल्या देशात आता बॅडमिंटनसारखा खेळही चांगला रुजू लागला आहे तो पुल्लेला गोपीचंद यांच्यासारख्यांच्या प्रयत्नांमुळे आणि सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधु, किदम्बी श्रीकांत यांच्यासारख्या खेळाडूंमुळे.
भारतीय बॅडमिंटन क्षेत्राचे अध्र्वयू म्हणून ख्याती मिळविलेले प्रकाश पदुकोण व पुल्लेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकूनही त्यांना या खेळाचे अपेक्षेइतके युग निर्माण करता आले नाही. ते कार्य सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत यांच्यासारख्या उदयोन्मुख खेळाडूंनी केले आहे. गेल्या सातआठ वर्षांमध्ये हा खेळ भारतात बहरत चालला आहे. या खेळातही करिअर करता येते हे या खेळाडूंनी दाखवून दिले आहे.
बॅडमिंटन या खेळाचे जन्मस्थान पुणे आहे हे सांगितल्यावर अनेकांचा त्यावर विश्वासही बसणार नाही. ब्रिटीशांच्या राजवटीत पुणे शहरात या खेळाचा जन्म झाला. असे असूनही या खेळाकडे अपेक्षेइतके लक्ष दिले गेले नाही. कदाचित क्रिकेटच्या अफाट लोकप्रियतेमुळे तुलनेने खर्चीक असलेल्या या खेळाचा अपेक्षेइतका विकास होऊ शकला नाही. क्रिकेटमध्ये अनेक वेळा सपाटून मार खाऊनही असंख्य चाहते व प्रायोजक या क्रिकेटपटूंच्या मागे धावत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे हे पदुकोण व गोपीचंद या दोन्ही खेळाडूंना जाणवले. त्यामुळेच अनेक स्तरावर संघर्ष करीत या खेळाडूंनी स्वत: सुखाची नोकरी सोडून प्रशिक्षण अकादमी सुरू केली. पदुकोण यांना विमलकुमार याच्यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूचीही साथ मिळाली. क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे झाकोळलेल्या क्रीडा क्षेत्रात आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी प्रत्येक स्तरावर झगडावे लागणार आहे हे पदुकोण व गोपीचंद या दोन्ही खेळाडूंना माहीत होते. त्यामुळेच परदेशी प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर, मसाजिस्ट आदी जागतिक स्तरावरील सर्व सुविधा आपल्या खेळाडूंना मिळतील याची काळजी त्यांनी घेतली. त्यांच्या अकादमीत तयार झालेल्या जी. ऋत्विका शिवानी, एच. एस. प्रणोय, अजय जयराम, आर. एम. व्ही. गुरुसाईप्रणीत, पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत यांच्यासारख्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा उंचावली आहे. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सतत अहोरात्र मेहनत घेत सायना नेहवालने जागतिक स्तरावर उत्तुंग झेप घेतल्यानंतर भारतामध्ये बॅडमिंटन युग निर्माण होण्यास मदत झाली. या खेळात करिअर करण्यासाठी तिने व तिच्या पालकांनी केलेला अफाट संघर्ष पाहून बॅडमिंटनविषयी लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. खेळात त्यातही बॅडमिंटन हे उपजीविकेचे साधन होऊ शकते असा विश्वास निर्माण झाला. लहान बहिणीसारखी तिची काळजी घेत गोपीचंद यांनी सायनाला घडविले. सायना हिने ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकण्यापूर्वीच तिने जागतिक स्तरावरील अन्य अव्वल दर्जाच्या स्पर्धामध्ये मिळविलेल्या सातत्यपूर्ण उत्तुंग यशामुळे देशात बॅडमिंटन युग निर्माण होण्यासाठी सकारात्मक व अनुकूल वातावरण निर्माण झाले. तिच्याकडे प्रायोजकांची रांग लागली. त्यानंतर पारुपल्ली कश्यप, अजय जयराम, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत, ज्वाला गट्टा, अश्विनी पोनप्पा यांच्यासह अनेक खेळाडूंनी भारतास बॅडमिंटनमध्ये गौरवास्पद स्थान मिळवून दिले असले तरी गेल्या साताठ वर्षांमध्ये या खेळासाठी प्रायोजकही मोठय़ा प्रमाणात मिळू लागले आहेत. भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धाच्या संख्येतही वाढ झाली आहे. क्रिकेटपटूंसारखे वलय बॅडमिंटनपटूंना मिळू लागले आहे. सिंधू हिने ऑलिम्पिक रौप्यपदक मिळविल्यानंतर तिच्यावर पारितोषिके व पुरस्कारांचा वर्षांव झाला. सायना, सिंधू, कश्यप, श्रीकांत यांनी बॅडमिंटन ही काही चीनची मक्तेदारी नाही हे दाखवून दिले आहे. पूर्वी भारतीय खेळाडू कोणाच्या खिसगणतीत नव्हते आता मात्र चीन, इंडोनेशिया, मलेशिया आदी देशांच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंचा धसका घेतला आहे.
आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये सनसनाटी विजय नोंदवीत असले तरीही ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ते विनाकारण मानसिक दडपण घेतात. श्रीकांत याच्याबाबतही असेच घडले आहे. खुद्द त्यानेच याबाबत कबुली दिली होती. रिओ येथे गतवर्षी झालेल्या स्पर्धेत त्याला पदक मिळविण्यात अपयश आले. ऑलिम्पिकचे वातावरण खूप वेगळे असते. चीन, मलेशिया, इंडोनेशिया आदी देशांचे खेळाडू तेथील लढती खूप गांभीर्याने घेताना मनोधैर्य उंच राहील याची काळजी घेत असतात. हा अपवाद वगळता श्रीकांत याने अन्य स्पर्धामध्ये सकारात्मक वृत्ती व भक्कम आत्मविश्वास ठेवीत सर्वोच्च यश मिळविले आहे. संयमी वृत्ती हा त्याचा स्थायीभाव आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला पाठीराख्यांकडून सतत प्रोत्साहन मिळत असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती श्रीकांत याच्याकडे आहे. यंदाच्या मोसमात त्याला सिंगापूर ओपन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आपण तेथे विजेतेपद मिळवू शकलो नाही याची खंत मनात ठेवीत त्याने या सामन्याचा बारकाईने अभ्यास केला. आपल्या खेळातील चुका कशा कमी होतील याचाच त्याने विचार केला. त्या आत्मपरीक्षणाचा फायदा त्याला इंडोनेशियन सुपरसीरिज व त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियन सुपरसीरिजमध्ये विजेता होण्यासाठी झाला. आगामी जागतिक स्पर्धेपूर्वी हे विजेतेपद त्याच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. आपण जागतिक स्तरावर जिंकू शकतो असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला आहे. जागतिक स्पर्धेतही त्याने विजेतेपद मिळवावे व ऐतिहासिक कामगिरी करावी अशीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. प्रणोय यानेही यंदाच्या मोसमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये लक्षवेधक कामगिरी केली आहे. जागतिक स्तरावर चीनच्या खेळाडूंचे वलय होते तसे वलय आता भारतीय खेळाडूंना प्राप्त झाले आहे. सायना व सिंधू यांना महिलांमध्ये जागतिक स्तरावर वलय प्राप्त झाले आहे. पुरुषांमध्येही श्रीकांत, कश्यप, प्रणोय आदी खेळाडूंची जगातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंमध्ये होऊ लागली आहे. श्रीकांत, प्रणोय, कश्यप आदी खेळाडू जागतिक स्तरावर केवळ स्वत:चा नव्हे तर आपल्या प्रशिक्षकाचाही नावलौकिक उंचावत असतात. त्याचप्रमाणे पंच, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षक आदी विविध पर्याय बॅडमिंटनमधील करिअरसाठी निर्माण झाले आहेत. मात्र आपल्याकडे एकमेकांचे पाय खेचण्याची वृत्ती नेहमीच दिसून येत असते. खेळाडू व प्रशिक्षक यांना मिळणारे यश व आर्थिक लाभ हे काही संघटकांच्या डोळ्यात खूपसत असते. ही मंडळी या प्रशिक्षकांविरुद्ध कलुषित वातावरण निर्माण करण्यात पटाईत असतात. जे क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांच्याबाबत घडत आहे, तसेच काहीसे वातावरण गोपीचंद यांच्या विरोधात निर्माण होऊ लागले आहे. एखाद्या खेळात भारतीय खेळाडूंनी केलेल्या सर्वोच्च कामगिरीमुळे जर प्रायोजकांची या खेळासाठी रीघ लागत असेल तर त्याद्वारे आपली पोतडी कशी भरता येईल याचाच विचार संघटकांकडून केला जातो. तिकडे खेळाचे किंवा खेळाडूंचे काहीही होवो, आपला उद्देश कसा सफल होईल हेच ही मंडळी पाहात असतात. खेळाडू व प्रशिक्षक आहेत म्हणून आपण आहोत हे संघटकांनी ओळखून त्यानुसार प्रशिक्षकांच्या कामात ढवळाढवळ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बॅडमिंटन हा खेळ बहरत चालला आहे. त्याचा अधिकाधिक विकास तळागाळापर्यंत कसा होईल याचा विचार संघटकांनी केला पाहिजे. तरच सायना व सिंधू यांच्यापासून स्फूर्ती घेत ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्यांची परंपरा आपल्या देशात निर्माण होईल.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा