संदीप कदम, लोकसत्ता
मुंबई : दुसऱ्या फळीतील खेळाडूंवर मेहनत घेतल्यास भविष्यात भारतीय बॅडिमटनचा स्तर आणखी उंचावेल, असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले.
विमल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरुष बॅडिमटन संघाने रविवारी १४ वेळा विजेत्या इंडोनेशियाला ३-० असे नमवत ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच थॉमस चषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले. १९८३च्या विश्वविजेतेपदानंतर २० ते २५ वर्षांनी देशात खेळाचा स्तर किती उंचावला आहे, हे आपण पाहतोय. बॅडिमटनमध्येही असे चित्र दिसण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यायला हवा, असे विमल कुमार यांनी सांगितले. थॉमस चषकाच्या यशाबाबत विमल म्हणाले, ‘‘१६० देश जगभरात बॅडिमटन खेळतात. याआधी इंडोनेशिया, चीन, जपान, डेन्मार्क आणि मलेशिया यांनीच थॉमस चषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे. भारत हे जेतेपद मिळवणारा केवळ सहावाच देश आहे. यावरून भारताची कामगिरी किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित होते. भारताचा हा सांघिक विजय असून ही भारतीय बॅडिमटनमधील आजवरची खूप मोठी कामगिरी आहे.’’
अंतिम सामन्यात भारताकडून लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत तर, सात्त्विकसाइराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आपापले सामने जिंकले. भारताच्या कामगिरीचे विश्लेषण करताना विमल म्हणाले,‘‘प्रत्येकाने या जेतेपदामध्ये आपले सर्वोत्तम योगदान दिले आहे. दुहेरीच्या सात्त्विक-चिराग जोडीची कामगिरी प्रशंसनीय ठरली. संघाच्या कामगिरीबाबत मी अत्यंत समाधानी आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबाबत मी त्यांना एक प्रोत्साहनात्मक संदेशही पाठवला. या स्पर्धेसाठी अंतिम संघ घोषित करण्यापूर्वी मी निवड समितीला भारताला जेतेपदाची चांगली संधी असल्याचे म्हटले होते. कारण, भारताकडे तीन चांगले एकेरीचे आणि दुहेरीचे खेळाडूही होते. त्यांनी आपल्या क्षमतेनुसार चांगली कामगिरी केली.’’ लक्ष्यची गेल्या काही महिन्यांतील सातत्यपूर्ण कामगिरी लक्षवेधी असली तरी अन्न विषबाधेच्या आजारपणावर मात करीत त्याने निकराने लढा दिला. लक्ष्यच्या कामगिरीबद्दल विमल म्हणाले, ‘‘लक्ष्यबाबत आम्हाला काळजी वाटत होती. कारण, आम्ही बँकॉकला जात असताना बंगळुरु विमानतळावर लक्ष्यला उलटय़ांचा त्रास जाणवू लागला. यातून सावरण्यास लक्ष्यला तीन दिवस लागले. यासह लक्ष्यला प्रत्येक देशातील सर्वोत्तम खेळाडूचा सामना करायचा होता. त्यामुळे त्याच्यावर दडपण होणे. अशा स्थितीत श्रीकांत आणि प्रणॉय या अनुभवी खेळाडूंनी त्याच्यासोबत चर्चा करून त्याचा आत्मविश्वास वाढवला.’’